लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नागरिक सुधारणा कायद्याला (सीएए) विरोध करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राज्यातील जनतेचा पाठिंबा मिळणार नाही. त्यांना निर्वासित आणि घुसखोर यांच्यातील फरकही माहीत नाही, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केली. ‘मी ममता बॅनर्जींना आवाहन करतो की, राजकारण करण्यासाठी इतर अनेक मुद्दे आहेत. बांगलादेशातून येणाऱ्या बंगाली हिंदूंना कृपया विरोध करू नका. तुम्हीही बंगाली आहात,’ असे शाह मुलाखतीत म्हणाले.
एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी सीएएला मुस्लीम विरोधी म्हटले आहे. यावर गृहमंत्री म्हणाले, ‘हा भाजपचा राजकीय खेळ नाही. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशातून येणाऱ्या लोकांना समान अधिकार देण्याची जबाबदारी आमचे नेते नरेंद्र मोदी आणि आमच्या सरकारची आहे. भारतातील अल्पसंख्याकांनी काळजी करण्याची गरज नाही, असे मी अलीकडे ४१ वेळा सांगितले आहे. हा कायदा कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेणार नाही.
‘निर्वासितांना दुसऱ्या जागी हलविणार नाही’
- पाकिस्तानातून स्थलांतरित होऊन जे हिंदू दिल्लीतील मंजू का टिला भागात राहत आहेत, त्यांनी भारतीय नागरिकत्वासाठी असलेली नोंदणी प्रक्रिया दिल्ली उच्च न्यायालयात १९ मार्च किंवा त्यानंतर उपस्थित राहून पूर्ण करावी असे त्यांना सांगण्यात आले आहे.
- ही माहिती या निर्वासितांपैकी एक असलेले धर्मेश्वर सोळंकी यांनी गुरुवारी दिली. त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात येणार नाही.
रोहिंग्या-बांगलादेशी घुसखोरांबद्दल माैन का?
या कायद्यामुळे निर्वासितांना नागरिकत्व मिळेल, हे धोकादायक आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडेल. लुटमार व चोरीच्या घटना वाढतील, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केला आहे. यावर शाह म्हणाले की, केजरीवाल यांना माहीत नाही की हे लोक निर्वासित असून २०१४ पूर्वीपासून येथे राहत आहेत. केजरीवाल हे बांगलादेशी घुसखोरांबद्दल का बोलत नाहीत? असा सवालही शाह यांनी केला.
‘सीएए आसामसाठी अजिबात उपयोगी नाही’
- सीएए हा कायदा आसामसाठी अजिबात उपयोगी नाही असे त्या राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी सांगितले. या राज्यातून निर्वासितांचे अगदी कमी प्रमाणात भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज दाखल होण्याची शक्यता असल्याचा त्यांनी दावा केला.
- जनतेने प्रश्न सोडविण्यासाठी शांततामय मार्गाने प्रयत्न करावेत, असे आवाहन आसामचे पोलिस महासंचालक जी.पी. सिंह यांनी केले आहे. सीएए कायद्याविरोधात आसाममध्ये निदर्शने करणाऱ्या विविध संघटनांना त्यांनी हे आवाहन केले आहे.
सीएए कायद्याविरोधात केलेल्या विधानांबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माफी मागावी अशी मागणी करत हिंदू, शीख निर्वासितांनी त्यांच्या निवासस्थानाजवळ गुरुवारी निदर्शने केली. हे निदर्शक चंडीग्राम आखाडा भागात जमले व केजरीवाल यांच्या घरावर मोर्चा घेऊन निघाला असताना पोलिसांनी वाटेतच त्यांना रोखले.