‘ते’ लोकशाहीचे संकेत पाळत नाहीत; प्रियांका गांधी यांची टीका, दोन दिवसांच्या वायनाडच्या दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 08:13 AM2024-12-01T08:13:24+5:302024-12-01T08:13:49+5:30
लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर त्या प्रथमच वायनाड येथे दौऱ्यावर आल्या आहेत.
कोझिकोड : भाजप लोकशाहीचे कोणतेही संकेत पाळत नाही, अशी टीका वायनाड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी शनिवारी केली. वायनाड लोकसभा मतदारसंघातील लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी सदैव कार्यरत राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर त्या प्रथमच वायनाड येथे दौऱ्यावर आल्या आहेत. यंदाच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेली व वायनाड या दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले होेते. त्यांनी वायनाड मतदारसंघ सोडला व रायबरेली मतदारसंघ कायम राखला. त्यामुळे वायनाडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक झाली. त्यात प्रियांका गांधींनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर ४ लाखांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळविला होता. (वृत्तसंस्था)
दुर्घटनाग्रस्तांना मदत मिळावी : राहुल गांधी
दरड दुर्घटनाग्रस्तांना मदत करावी यासाठी केरळ सरकारवर काँग्रेस व यूडीएफ आघाडीने दबाव आणला पाहिजे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितले. प्रियांका गांधी वायनाड दौऱ्यावर आल्या असून, त्यांच्यासोबत राहुल गांधी यांचेही आगमन झाले आहे. दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्याची केंद्र सरकारला इच्छा नाही, असाही आरोप केला.