"यांना तर गवार आणि तुरीमधला फरक समजत नाही, केजरीवाल आणि राहुल गांधींवर बोचरी टीका’’
By बाळकृष्ण परब | Published: December 18, 2020 10:17 AM2020-12-18T10:17:51+5:302020-12-18T13:47:39+5:30
Farmer Protest : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावरून सध्या राजकारणही जोरात सुरू आहे.
अहमदाबाद - केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावरून सध्या राजकारणही जोरात सुरू आहे. दरम्यान, गुजरात प्रदेश भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. दोन्ही नेत्यांना गवार आणि तूर यांच्यातील फरक समजतो का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.
पाटील यांनी केजरीवाल यांचा उल्लेख कागदी वाघ असा केला. तर काँग्रेस शेतकऱ्यांना भ्रमित करत आहे, असा आरोप केला. ते म्हणाले की, काँग्रेस जेव्हा सत्तेत होती. तेव्हा ती कृषी सुधारणांच्या बाजूने होती. सूरत जिल्ह्यातील बार्डोली येथे शेतकऱ्यांच्या एका सभेला संबोधित करताना पाटील यांनी सांगितले की, दिल्ली एक शहर आहे, त्याला राज्याचा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे त्याला एक मुख्यमंत्रीही आहे. खरंतर दिल्लीचे मुख्यमंत्री असलेल्या केजरीवाल यांच्याकडे केवळ एका शहराच्या महापौरांकडे असतात तेवढेच अधिकार आहेत.
त्यांनी सांगितले की, केजरीवाल आता संपूर्ण देशाच्या राजकारणात आपला दबदबा बनवू इच्छित आहेत. मात्र ते कागदी वाघापेक्षा अधिक काही नाही आहेत. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी तिन्ही कृषी कायद्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सभांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे.
यादरम्यान, आयोजित करण्यात आलेल्या एका सभेमध्ये पाटील म्हणाले की, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना गवार आणि तुरीमधील फरक माहिती नसेल याबाबत माझ्या मनात काहीच शंका नाही. असे लोक आज शेतकऱ्यांच्या हिताच्या बाता मारत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. चंद्रकांत पाटील हे गुजरात भाजपाचे बिगर गुजराती अध्यक्ष आहेत. ते मुळचे जळगावचे आहेत. त्यांनी सुरुवातीच्या काळात पोलीस दलात काम केले होते .