पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता येथे १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या तिहेरी हत्याकांडाबाबत पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. मृत कुटुंब हे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेलं होतं. मात्र तरीही ते मौजमजा करत जगत होता. या आर्थिक अडचणींमुळेच हे तिहेरी हत्याकांड घडलं, असावं, अशी पोलिसांना शंका आहे. या तिहेरी हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या रोमी डे आणि सुदेशना डे या महिलांचे पती प्रसून डे आणि प्रणय डे यांनी आपल्या पत्नींची हत्या केल्यानंतर एका अल्पवयीन मुलीचाही जीव घेतल्याचा संशय आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही भावांनी आधी आपल्या पत्नी आणि नंतर मुलगी प्रियंवदा डे यांची हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वत:चं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. हे दोघेही ज्या वाहनातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, त्याला अपघात झाला. तसेच यात ते गंभीर जखमी झाले. सध्या प्रसून डे आणि प्रणय डे यांना पोलिसांनी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तत्पूर्वी १९ फेब्रुवारी रोजी सकाळी कोलकाता पोलिसांच्या वाहतूक विभागाने शहराच्या बाहेरील भागात असलेल्या घरातून तीन मृतदेह ताब्यात घेतले आहेत.
दरम्यान, पोस्ट मार्टेम रिपोर्टमधून आत्महत्येची शक्यता फेटाळून लावण्यात आल्याने हा हत्येचाच प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, डे कुटुंब हे चामड्याच्या सामानाचा व्यवसाय करायचे. मात्र ते मागच्या काही काळात मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाले होते. मात्र तरीही ते ऐशोआरामी जीवन जगत होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचं आर्थिक गणित बिघडून परिस्थिती आणखीच बिकट झाली होती. दरम्यान, त्यांच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्जाच्या वाढत्या दबावामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
तपासादरम्यान, ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी घरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते, अशी माहितीही पोलीस तपासामधून समोर आली आहे. त्यामुळे हे हत्याकांड पूर्वनियोजित असल्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, पोलीस याबाबत सखोल तपास करत असून, आरोपींचीही कसून चौकशी केली जात आहे.