अयोध्या: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Singh) यांनी युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे मात्र अयोध्या दौऱ्यावर स्वागत केले आहे. राज ठाकरे यांना असणारा विरोध कायम असून, आदित्य ठाकरे यांना कोणीही विरोध करणार नाही, असे बृजभूषण सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
आम्हाला माहिती आहे की, आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांना कोणीही विरोध करणार नाही. त्यांना कोणत्याही मंदिरात जायचे असल्यास कोणीही विरोध करणार नाही. विरोध फक्त एकाच व्यक्तीला आहे, ज्यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे. राज ठाकरे यांच्या कुटूंबातील त्यांची आई, पत्नी, मुलगा आल्यास त्यांनी मी माझ्या घरी त्यांना आमंत्रित करेन. पण राज ठाकरे माफी मागत नाहीत तो पर्यंत त्यांना इथे येऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे.
बृजभूषण सिंह हे संजय राऊत यांना भेटणार
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे बृजभूषण सिंह यांची अयोध्येत भेट होणार आहे. शरयू नदीच्या किनारी संजय राऊत हे बृजभूषण सिंह यांची भेट घेणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह आणि संजय राऊत यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्येला जाण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक उत्तर प्रदेशकडे निघाले आहेत. ठाण्याहून काही शिवसैनिक अयोध्याला रेल्वेने रवाना झाले. आदित्य ठाकरे १५ जून रोजी सकाळी ११ वाजता लखनऊ विमानतळावर उतरतील. त्यानंतर दुपारी १.३० वाजता ते अयोध्येमध्ये जातील.