श्रीगोंदा (अहमदनगर) : वृद्धापकाळात विपन्नावस्थेत जगणाऱ्या येथील सखूबाई व सरूबाई मडके या निराधार भगिनींच्या संघर्षमय जीवनावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकताच त्यांच्या मदतीसाठी राज्यभरातून अनेक हात पुढे आले आहेत.श्रीगोंदा येथील सप्रेवाडीत सरूबाई व सखूबाई एका छोट्या पडक्या खोलीत राहतात. तेथे ना वीज ना इतर व्यवस्था. ‘लोकमत’ने त्यांची व्यथा मांडताच टाकळी ढोकेश्वरच्या फिनिक्स युवा प्रतिष्ठानने त्यांना दरमहा एक हजार, अमरावतीच्या जानराव घोगड, शिवाजी खोडदे (ढवळपुरी) यांनी ५०० रुपये भोजन भत्ता देण्याचे जाहीर केले. श्रीगोंदा येथील नवले मेजर यांनी पाच हजार, अॅड. कृष्णा घावटे यांनी एक हजार तर शिवाजी खोडदे यांनी ५०० रुपयांची रोख मदत दिली. येथील डॉ. अनिल घोडके यांनी वृद्ध भगिनींना वैद्यकीय सेवा मोफत देण्याचा निर्णय घेतला. श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली, तर माजी नगरसेविका अनिता औटी व सतीश पोखर्णा यांनी दरवर्षी प्रत्येकी ५० किलो धान्य देण्याची व्यवस्था केली आहे. पुणे येथील सुरेखा जंगले-शेंद्रे यांनी स्वेटर्स पाठविले आहेत. (प्रतिनिधी)‘नाम’कडून दखल ‘लोकमत’मधील बातमी वाचून अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याही मनाला वेदना झाल्या. त्यांनी ‘नाम’चे सचिव राजाभाऊ शेळके यांना मडके भगिनींची माहिती मागवून मदत करण्यासाठी सूचना दिल्या. नगरच्या डॉ. राजेंद्र धामणे यांनी माउली प्रतिष्ठानमध्ये भगिनींना आसरा देण्याची तयारी दर्शविली आहे.देवच भेटले! थोरली बहीण सखूबाई आजारी पडली. आजारपणामुळे १० हजारांचे कर्ज झाले. कर्ज कसे फेडावे, याची चिंता होती. ‘लोकमत’मध्ये आमचा फोटो आला. त्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा पेपर पाहिला. दुसऱ्या दिवशी मोठी माणसं आमच्या पडक्या घराकडे आली. मदतीचा हात दिला आणि वाटलं, जगात आपलं कोणी तरी आहे. आम्हाला देवच भेटले, अशी भावना सरूबाई यांनी व्यक्त केली.
‘त्या’ भगिनींच्या मदतीसाठी सरसावले हात
By admin | Published: November 26, 2015 3:29 AM