चंदीगड : पाकिस्तानातून पंजाबच्या सीमेवरील पठाणकोट जिल्ह्यात घुसखोरी करणाऱ्या पांढऱ्या कबुतराने पंजाब पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेची झोप उडविली आहे. सध्या हे कबुतर पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याजवळ उर्दूत लिहिलेला एक संदेश व काही नंबर मिळाले आहेत.इंडियन मुजाहिदीन जम्मू व पठाणकोट भागात सक्रिय होऊ शकते, असा सतर्क तेचा इशारा गुप्तचर संस्थेने दिल्यानंतर दोन दिवसांनीच हा प्रकार घडला, हे विशेष! हे कबुतर बुधवारी सायंकाळी ६.३० वाजेदरम्यान पाक सीमेपासून चार कि.मी. अंतरावरील पठाणकोट जिल्ह्यातील मनवाल गावात रमेश चंद्रा यांच्या घरावर उतरले. त्याच्या शरीरावरील उर्दूमधील लिखाण बघून चंद्रा यांच्या १४ वर्षांच्या मुलाला संशय आला आणि रात्री ९ वाजता या संशयित हेर कबुतरासह त्याने जवळील पोलीस चौकी गाठली. या कबुतराजवळ असलेली तारेसारखी वस्तू आणि उर्दू भाषेतील संदेश बघून पोलिसांमध्ये खळबळ उडाली. नंतर पोलिसांनी या कबुतराला पठाणकोटच्या पशुचिकित्सालयात नेले आणि तेथे त्याचा एक्सरे काढला; मात्र त्यात काही आढळले नाही. कबुतराजवळील दूरध्वनी क्रमांक पाकिस्तानच्या नारोवल जिल्ह्यातील असल्याचे समजते. या कबुतराजवळ आणखी काही धोकादायक वस्तू आढळली नसली तरी आम्ही त्याला आमच्या ताब्यात ठेवले आहे, असे पठाणकोटचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राकेश कौशल यांनी सांगितले. बामिया पोलीस चौकीतील पोलिसांनी आपल्या नोंदवहीत या कबुतराची नोंद ‘संशयित हेर’ अशी केली आहे.
पाकचे ‘ते’ कबुतर अडकले पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2015 12:12 AM