गॅरंटीमुळे ते मला शिव्या देताहेत; तरुण नेत्यांना काँग्रेस प्रोत्साहन देत नाही; पंतप्रधान मोदींचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 09:55 AM2024-03-06T09:55:12+5:302024-03-06T09:56:16+5:30
येथे भाजपच्या सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, आपण कधीही वैयक्तिक हल्ला केला नाही. परंतु घराणेशाहीच्या राजकारणाविरोधात आवाज उठविला आहे. आपण लोकांना दिलेली ‘गॅरंटी’ अंमलात आणण्यास उत्सुक आहोत, म्हणून काँग्रेस आणि मित्रपक्ष आता मला शिव्या देत आहेत.
संगारेड्डी (तेलंगणा) : काँग्रेस पक्ष तरुण नेत्यांना प्रोत्साहन देण्यास घाबरतो आणि ७५-८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नेत्यांना संधी देतो, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव न घेता केली. घराणेशाही जपणारा पक्ष आपल्याला लक्ष्य करीत आहे. कारण आपण त्यांचे अनेक हजारो कोटी रुपयांचे घोटाळे उघड करीत आहोत, असा आरोपही त्यांनी केला.
येथे भाजपच्या सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, आपण कधीही वैयक्तिक हल्ला केला नाही. परंतु घराणेशाहीच्या राजकारणाविरोधात आवाज उठविला आहे. आपण लोकांना दिलेली ‘गॅरंटी’ अंमलात आणण्यास उत्सुक आहोत, म्हणून काँग्रेस आणि मित्रपक्ष आता मला शिव्या देत आहेत.
काँग्रेसला भीती वाटते म्हणून...
काँग्रेसवर ताशेरे ओढताना ते म्हणाले की, पक्षाने कधीही ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला बढती दिली नाही. जर त्यांना कुणाला नियुक्त करायचे असेल, तर ते ७५-८० वर्षांच्या, ८५ वर्षांच्या व्यक्तीला नियुक्त करतील.
त्यांना भीती वाटते, की एखादा ५० वर्षांचा माणूस आला आणि त्याने मागे टाकले तर कुटुंबाचे काय होईल? मोदी यांनी मंगळवारी हैदराबाद येथील श्री उज्जयिनी महाकाली मंदिरात देशवासीयांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
७,२०० कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधान मोदी यांनी संगारेड्डी येथे ७,२०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हे प्रकल्प रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यांसारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्राशी संबंधित आहेत.