नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले असून ज्यांना जामिन मिळाला आहे त्यांनी आनंद घ्यावा, उठसूठ तुरुंगात टाकायला ही काही आणीबाणी नाही, असा टोलाही लगावला आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाच्या आभारप्रदर्शनामध्ये मोदी बोलत होते. सोमवारी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन यांनी मोदी आणि भाजपा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी भ्रष्टाचारी असल्याचे आरोप करत दोनवेळा सत्तेवर आले आहे. जर ते चोर असतील तर संसदेत कसे बसलेत, असा सवाल मोदींना केला होता. तसेच मोदींवर टीका करताना त्यांची जीभही घसरली होती. यावर मोदींनी आज उत्तर दिले आहे.
मोदींनी सांगितले की, आम्हाला अशासाठी दोषी धरले जात आहे की काही लोकांना आम्ही तुरुंगात टाकले नाही. ही काही आणीबाणी नाहीय की सरकार कोणालाही तुरुंगात डांबेल. ही लोकशाही आहे आणि न्यायव्यवस्था याचा निर्णय घेईल. आम्ही कायद्याला त्याचे काम करायला देतो. जर कोणाला जामिन मिळाला असेल त्याने आनंद घ्यावा. आम्ही बदला घेण्यावर विश्वास ठेवत नाही पण भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई जरूर सुरू ठेवणार. आम्हाला देशाने एवढे दिले आहे की चुकीच्या रस्त्यावर जाण्याची गरज नाही.