भोपाळ : महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याशिवाय गत्यंतर न उरल्याने काँग्रेस व नवीन ‘घमंडिया’ आघाडीतील त्याच्या मित्र पक्षांनी संसदेत या विधेयकाला अत्यंत जड मनाने पाठिंबा दिला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे म्हटले. जर तुम्ही त्यांना संधी दिली तर ते या विधेयकाबाबत पहिले पाढे पंचावन्न करतील, असा इशाराही त्यांनी दिला.
कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. यावेळी या सर्वांत जुन्या पक्षाची जोरदार धुलाई करताना तुलना गंजलेल्या लोखंडाशी केली. काँग्रेसला नेते चालवत नसून शहरी नक्षलवाद्यांकडे तो चालवायला दिला आहे. पुन्हा संधी दिल्यास काँग्रेस मध्य प्रदेशला पुन्हा रोगट राज्याच्या श्रेणीत ढकलेल, असेही ते म्हणाले.
मोदी म्हणजे हमी पूर्ण करण्याची हमीn काँग्रेस आणि घमंडिया आघाडीतील त्याच्या मित्र पक्षांना महिला शक्तीचे सामर्थ्य कळून चुकल्याने त्यांना महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याशिवाय गत्यंतर उरले नव्हते. त्यांनी जड मनाने या विधेयकाला पाठिंबा दिला. ‘मोदी है तो मुमकिन है’मुळे हे विधेयक मंजूर झाले. मोदी म्हणजे हमी पूर्ण करण्याची हमी, असेही ते म्हणाले. n सत्तेत असताना हे विधेयक मंजूर होऊ न दिल्याबद्दल त्यांनी काँग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांवर टीका केली. संधी मिळाल्यास लोकसभा, राज्य विधानसभांत महिलांना आरक्षण देण्याच्या विधेयकावरून काँग्रेस माघार घेईल, असा दावा त्यांनी केला.