नवी दिल्ली : माझ्यावर हल्ले होत नाहीत. तर ते जाणूनबुजून घडवले जात आहेत, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. काल सचिवालयात केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीनं हल्ला केला. यानंतर केजरीवाल यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मला मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला. अरविंद केजरीवाल यांच्यावर काल झालेल्या हल्ल्यासाठी आम आदमी पार्टीनं भाजपाला जबाबदार धरलं आहे. 'माझ्यावर दोन वर्षात चार हल्ले झाले आहेत. ही साधीसुधी बाब नाही. हे हल्ले होत नाहीत. तर ते घडवून आणले जात आहेत. या हल्ल्यांसाठी आदेश दिले जात आहेत. आम्ही यांच्यासाठी अडथळा ठरत आहोत. त्यामुळेच हे सर्व मिळून माझ्या जीवावर उठले आहेत. हे लोक वारंवार आमच्यावर हल्ले करत आहेत,' असा आरोप केजरीवाल यांनी केला. केजरीवाल यांच्यावर काल सचिवालयात हल्ला झाला. केजरीवाल त्यांच्या चेंबरमधून एक व्यक्ती त्यांच्याजवळ आली. या व्यक्तीनं बोलता बोलता अचानक केजरीवालांवर मिरचीपूड फेकली. यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं. या व्यक्तीचं नाव अनिल असल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली.
ते लोक माझ्या जीवावर उठलेत- केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 6:45 PM