अयोध्येहून परतणाऱ्या ट्रेनला आग लावण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात बेंगलोर पोलिसांनी धार्मिक भावना भडकावल्याच्या आरोपावरून तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही विशेष ट्रेन यात्रेकरूंना घेऊन अयोध्येहून म्हैसूरला परतत होती. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 8.40 च्या सुमारास संबंधित तीन आरोपी ट्रेनच्या दुसऱ्या बोगीत चढले होते. यावेळी भाविकाने ‘जय श्री राम’ अशी घोषणा दिल्यानंत, आरोपींनी ट्रेन जाळण्याची धमकी द्यायला सुरुवात केली. यावर ट्रेनमधील काही प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी आरोपींना पकडून रेल्वे पोलीस दलाच्या ताब्यात दिले. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात न घेतल्याने जमलेल्या लोक आणखी संतप्त झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची महिती पसरताच भाजपचे शेकडो कार्यकर्त्ये आणि समर्थक रेल्वे स्थानकावर जमा झाले. त्यांनी तिन्ही आरोपींच्या अटकेची मागणी केली. पिस्थिती चिघळत असल्याचे पाहून बेल्लारीचे पोलीस अधीक्षक बीएल श्रीहरिबाबू काही पोलीस स्थानकांतील पोलीस कर्मचाऱ्यांसोबत रेल्वे स्थानकात पोहोचले.
श्रीहरिबाबू म्हणाले, 'आम्ही या घटनेसंदर्भात होसपेट येथील एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 295A (धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने दुर्भावनापूर्ण कृत्य), 504 (जाणुनबुजून अपमान करणे), 506 (जीवे मारण्याची धमकी देणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच 2 आरोपींचा शोध सुरू आहे.'
काँग्रेस अशा घटनांना प्रोत्साहन देत आहे : भाजप नेते -भाजप नेत्यांनी संबंधित घटनेचा निषेध केला आहे. तसेच केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही काँग्रेसवर थेट आरोप केला आहे. 'व्होट बँकेसाठी काँग्रेस अशा घटनांना प्रोत्साहन देत आहे. अशा धमक्या देणाऱ्यांच्या पाठीत लाथा घालायला हव्यात,' असे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या एका महिन्यात तब्बल 60 लाख भाविकांनी घेतले रामललांचे दर्शन -अयोध्येतील राम मंदिरात रामलला विराजमान होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 22 जानेवारी 2024 रोजी रामललांची प्राणप्रतिष्ठा झाली. पहिल्या दिवशी केवळ प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांनाच राम ललांचे दर्शन घेण्याची परवानगी होती. यानंत 23 जानेवारीपासून सर्वांसाठी मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले. तेव्हापासून येथे दर्शनासाठी भक्तांच्या रांगा दिसत आहेत. 23 जानेवारीलाच जवळपास 5 लाख भाविकांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले. तर गेल्या एका महिन्यात तब्बल 60 लाख भाविकांनी रामललांचे दर्शन घेतले असून एकूण 25 कोटी रुपयांहूनही अधिकचे दान केले आहे. हे दान मंदिर परिसरातील दान-पात्र आणि दान काउंटरवर प्राप्त झाले आहे.