पशुवैद्यकाचा अहवाल : दादरीचा हकनाक बळी
नवी दिल्ली : संपूर्ण देशात वादळ निर्माण करणार्या दादरी हत्याकांडात बळी गेलेल्या मोहम्मद अखलाक याच्या घरातील रेफ्रिजिरेटरमध्ये सापडलेले मटण गायीचे नव्हेतर बकर्याचे होते, असे स्पष्ट झाले आहे.उत्तर प्रदेश सरकारने अखलाकच्या घरातून जप्त केलेले मटण तपासणीसाठी पशुवैद्यकीय विभागाकडे पाठविले होते. या विभागाने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला असून त्यात हे मटण गायीचे नाहीतर बकर्याचे होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. उत्तर प्रदेशच्या दादरीमध्ये गेल्या २९ सप्टेंबरला संतप्त जमावाने गोमांस सेवनाच्या अफवेनंतर अखलाक आणि त्याच्या कुटुंबीयांवर सशस्त्र हल्ला केला होता. या हल्ल्यात अखलाक मृत्युमुखी पडला तर त्याचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. पीडित कुटुंबाने हे गोमांस नसल्याचे जीवतोडून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु जमाव त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता. गावातील एका मंदिरात अखलाकच्या कुटुंबाने घरात गोमांस साठवून ठेवले असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर हे हत्याकांड घडले. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी स्थानिक भाजपा नेत्याच्या मुलासह डझनावर लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. गेल्या आठवड्यात ग्रेटर नोएडामधील न्यायदंडाधिकार्यांच्या न्यायालयात याप्रकरणी १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात भाजपा नेत्याचा मुलगा विशाल राणा याचाही समावेश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)