पोर्ट ब्लेअर : दक्षिण अंदमान जिल्ह्यात मगरींचे माणसावरील हल्ले वाढल्याने येथील मानवी वस्तीतील मगरींना वन विभागाकडून हटविण्यात येणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटांचे मुख्य वन संवर्धक एम. एस. नेगी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मानवी वस्त्यांतील मगरींचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच येथे आढळून आलेल्या मगरींना हटविण्यास सांगण्यात आले आहे. मगरींच्या हल्ल्याच्या घटनांत वाढ झाल्यानंतर नेगी यांनी याच आठवड्यात दक्षिण अंदमानातील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या होत्या. मानव आणि मगरीतील संघर्षांविरोधात करण्यात आलेल्या उपाययोजनांचीही त्यांनी माहिती घेतली. कोर्बिन्स कोव्ह, न्यू वंदूर आणि मुंदापहार येथील भेटीत त्यांनी अधिकाऱ्यांना धोकादायक ठिकाणी पोहण्यास प्रतिबंध घालणारे फलक लावण्याच्या सूचना दिल्या, तसेच धोक्याच्या सूचना देणारे फलक लावण्यासही सांगितले. सुरक्षिततेसाठी बसविण्यात आलेल्या जाळ्या नादुरुस्त झाल्या असल्यास त्यांची डागडुजी करण्याच्या सूचना नेगी यांनी दिल्या. मगरींचा वावर असलेल्या खाड्यांच्या काही भागांत कुंपण घालण्यात आले आहे. शाळकरी मुलांनी अशा ठिकाणी प्रवेश करू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)>संघर्षाचे प्रमुख कारणखाड्यांत टाकण्यात येणारा कचरा आणि खरकटे मानव-मगरींतील संघर्षाचे प्रमुख कारण असल्याचे नेगी यांनी सांगितले. ते म्हणाले की, या कचऱ्यामुळे मगरी आकर्षित होतात. विशेषत: कचरा टाकला जात असतानाच त्या तिकडे धाव घेतात आणि हल्ले करतात.
मानवी वस्त्यांतील मगरी हटविणार
By admin | Published: August 15, 2016 6:14 AM