मुंबई - सैन्य दलातील नोकरी म्हटलं की मोठी कसरत आलीच. अगदी घर, गावापासून दूर सीमारेषेवर तैनात व्हावे लागते. कधी काश्मीर खोऱ्यात तर कधी गलवान घाटीतील सियाचीनला, कधी लडाखला तर कधी पाकिस्तानच्या बॉर्डरवरही जवानांना देश संरक्षणासाठी पहारा द्यावा लागतो. शत्रुचा सामना करण्यासाठी शारिरीक आणि मानसिक फिटनेस महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे, सैन्याती जवानांना दररोज व्यायाम आणि शरीर तंदुरूस्तीकडे लक्ष द्यावे लागते. सैन्यातील एका निवृत्त जवानाने शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
शौर्यचक्र प्राप्त निवृत्त मेजर पवनकुमार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओत जवानाने केलेल्या कसरती पाहून डोळ्याच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीही हा व्हिडिओ लाईक केलाय. तर, ज्येष्ठ पत्रकारांनीही या व्हिडिओला पसंती दिली आहे. या व्हिडिओत जवानाने केलेल्या कसरती ऑलिंपिक खेळाडूच्या बरोबरीच्या असल्याच्या कमेंट काहींनी केल्या आहेत.