चेन्नई, दि. 9 - ऑनलाइन गेम ब्लू व्हेलच्या जाळ्यात अडकलेल्या मुलांची संख्या मोठी नसून, त्याचे धोके लक्षात येऊ लागल्यानंतर काही मुलं समोर येऊ लागली आहे. एक 12 वर्षांचा चिमुरडाही या सुसाईड गेमच्या जाळ्यात अडकला होता. तामिळनाडूमधील तिरुपूर येथे राहणा-या या 12 वर्षाच्या मुलाने राज्याच्या 104 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करुन आपण ब्लू व्हेलच्या जाळ्यात अडकल्याची माहिती दिली.
मुलाने फोन केला असता समुपदेशकाला सांगितलं की, 'ते लोक मला आणि माझ्या कुटुंबाला मारुन टाकतील'. सुरुवातीला मुलगा इतर कोणती माहिती देण्यास तयार नव्हता. नंतर मात्र आपण ब्लू व्हेल गेम खेळत असून आपल्याला त्यातून बाहेर पडायचं आहे हे त्याने मान्य केलं.
आत्महत्या प्रतिबंधक केंद्र स्नेहाच्या संस्थापिका डॉक्टर लक्ष्मी विजयकुमार यांनी सांगितलं आहे की, 'या धोकादायक गेममुळे मुलांच्या आत्महत्येचं वाढतं प्रमाण लक्षात घेता जी तरुण मुलं हा गेम खेळत आहेत, ते यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत'. अनेक मुलं या गेममधून बाहेर पडताना घाबरतात. कारण असं केल्यास त्यांचे आई-वडिल, बहिण किंवा भावाला मारण्याची धमकी दिलेली असते.
गेल्या काही दिवसांपासून ब्लू व्हेल गेम आणि त्यामुळे होणा-या आत्महत्यांची प्रकरणं समोर येत असल्याने अनेक मुलांनी आपण हा गेम खेळत असल्याचं मान्य केलं आहे. सुरुवातीला एक आव्हान म्हणून खेळण्यास सुरुवात करणारी मुलं आपलं आयुष्य संपवण्यासही तयार झालेली असतात.
काय आहे ब्ल्यू व्हेल चॅलेंज गेम?ब्लू व्हेल हा एक व्हिडीओ गेम असून 2013मध्ये रशियामधून या खेळाची सुरुवात झाली. हा गेम खेळणा-याला 50 चॅलेंजेस मिळतात. फिलिपनं लोकांसोबत विशेष करुन 20 वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना टार्गेट करुन त्यांच्यासोबत ऑनलाइन संपर्क वाढवण्यास सुरुवात केली. याद्वारे तो लोकांना स्वतःबाबत माहिती देण्यास सांगायचा, स्काइपवर त्यांच्यासोबत बोलायचा. यावेळी तो कमकुवत लोकांची निवड करायचा. लोकांची निवड झाल्यानंतर अॅडमिन खेळाडूंना रोज एक टास्क देतात, हा टास्क 50 दिवसांमध्ये पूर्ण करायचा असतो. गेमची सुरुवात सोप्या टास्कने होते. मात्र यानंतर कठीण-कठीण टास्क दिले जातात. टास्कमध्ये हाताच्या नसा कापणे, जनावराला मारणे व अंतिम टप्प्यात आत्महत्या करायला सांगितली जाते. प्रत्येक टप्पा पार केल्यानंतर फोटोंच्या रुपात स्टोर करायचा असतो.
यामध्ये कुटुंब व मित्रांशी संपूर्ण संबंध तोडणे, स्वत:ला इजा करून घेणे यांचा समावेश आहे. याचे चित्रण गेमच्या क्युरेटरला पाठवावे लागते, जेणेकरून दिलेले आव्हान पूर्ण होण्याची खात्री होते. अखेर पर्यवेक्षक सहभागींना आत्महत्या करण्याचे आव्हान देतो. गेम डाउनलोड केला की, तो डिलिट होत नाही. वापरकर्त्याची वैयक्तिक माहितीदेखील हॅक होण्याची शक्यता असते. एक-एक टप्पा पार केल्यानंतर फोटोंच्या स्वरुपात पुरावा द्यावा लागतो त्यानंतरच खेळाडू पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतो.