लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील खजुवा पोलीस चौकीपासून काही अंतरावर असलेल्या एका मंदिरात चोरी झालीय. मंदिरात शिरलेल्या चोरानं देवी-देवतांच्या मूर्तींवरील मुकूट आणि इतर सामान घेऊन पोबारा केला. मात्र जाताना या चोरानं हनुमानाच्या मूर्तीच्या पायाला स्पर्श करुन माफी मागितली. यानंतर हा चोर मंदिरातून चोरलेले दागिने घेऊन पसार झाला. मंगळवारी घडलेल्या या घटनेचा तपास सध्या पोलिसांकडून सुरूय. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलीय. त्याआधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलाय. खजुवा पोलीस चौकीजवळच्या रकाबगंजमध्ये हनुमान आणि अन्य देवी-देवतांची मंदिरं आहेत. या मंदिरांच्या देखरेखीचं काम तिथेच राहणारे राम शंकर करतात. 'मंगळवारी रात्री मंदिरात भंडारा होता. रात्री 11 वाजता सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आलं. रात्री साडे बारा वाजेपर्यंत भाविक जागे होते. यानंतर मंदिर बंद करुन भाविक झोपायला गेले,' अशी माहिती राम शंकर यांनी दिली. सकाळी राम शंकर मंदिरात साफसफाई करायला आले. त्यावेळी त्यांना मंदिरात चोरी झाल्याचं लक्षात आलं. यानंतर राम शंकर यांनी स्थानिकांना घटनेची माहिती दिली. पोलिसांना याबद्दलची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केलाय. पोलिसांनी मंदिराचं सीसीटीव्ही फुटेज तपासलंय. यामध्ये चोर दागिने घेऊन पसार होताना दिसतोय. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केलाय.
अजब चोर! चोरी करून मंदिरातून पळून जाण्याआधी मागितली देवाची माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 1:31 PM