अलाप्पुझा - लाखोंचा ऐवज घेऊन लंपास झालेल्या चोरांच्या चोरीचे अनेक किस्से आपण नेहमीच ऐकतो. तुम्हाला जर कोणी एखाद्या चोराने चोरलेला माल परत केल्याचं सांगितलं तर तुमचा आधी विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. केरळच्या अंबालप्पुझामधील अशीच एक अजब घटना समोर आली आहे. एका चोराने चोरी केल्यानंतर पश्चाताप झाला म्हणून सगळे दागिने हे मालकाला परत केले. त्यासोबतच त्याने एक माफी मागणारं पत्रही लिहिलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधु कुमार हे आपल्या कुटुंबीयांसोबत भावाच्या लग्नासाठी करुवट्टा येथे गेले होते. मात्र घराचा मुख्य गेट लॉक करायचं विसरून गेले. त्याच दरम्यान चोराने संधी साधत घरातील मौल्यवान वस्तू लंपास केल्या. मधु कुमार घरी परतल्यावर त्यांना घरातील सामान अत्याव्यस्त पडलेलं दिसलं. घरामध्ये चोरी झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली.
पोलिसही चोराचा शोध घेत होते. मात्र एक दिवस असं काही घडलं की सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. गुरुवारी (12 जुलै) सकाळी मधु कुमार यांच्या घराच्या गेटसमोर एका कागदामध्ये चोरीला गेलेले सोन्याचे दागिने सापडले. त्यासोबतच एक माफी मागणारं पत्रही होतं. 'कृपया, मला माफ करा, मला पैशाची अत्यंत गरज असल्याने मी दागिने चोरले. याची तक्रार पोलिसांकडे करू नका, यापुढे मी असं कृत्य करणार नाही' असा मजकूर चोराने पत्रात लिहिला होता.