कोची - चोरी करण्याच्या उद्देशाने गेलेल्या चोराच्या मनात देशभक्ती निर्माण झाली. केरळमध्ये ही अनोखी घटना घडली आहे त्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. तिरुवनाकुलम परिसरातील घरात शिरलेल्या चोरला जेव्हा हे समजले की हे लष्करातील सेवानिवृत्त कर्नलचे घर आहे. त्यावेळी त्याच्या मनात देशभक्ती जागी झाली.
त्याने कर्नलच्या घरातून १५०० रुपये आणि वॉर्डरोबमधून महागड्या दारु घेऊन तिथून निघून गेला. मात्र जाता जाता त्याने कर्नलकडे माफी मागत घराच्या भिंतीवर माफीनामा लिहून ठेवला. चोराने आपली चूक मान्य करून बायबलचा संदर्भही दिला. चोरट्याने कर्नलच्या घराच्या भिंतीवर लिहिले की, 'जेव्हा मी कर्नलची कॅप पाहिली तेव्हा मला समजले की हे घर लष्करातील अधिकाऱ्याचे आहे. जर मला आधीच माहित असते तर मी या घरात कधीच आलो नसतो. कृपया मला माफ करा. मी बायबलच्या सातव्या आदेशाचं उल्लंघन केले आहे. तुम्ही नरकापर्यंत माझ्यामागे लागाल असं त्याने लिहिलं आहे.
इतकचं नाही तर चोराने अन्य घरातून चोरलेल्या कागदपत्रांची भरलेली बॅगही तिथे सोडली. बॅगसोबत एक चिठ्ठी सोडली. त्यात लिहिलं होतं की, 'कृपया, ही बॅग त्या दुकानदाराला परत करा. याबाबत पोलिसांनी सांगितले की, चोर कदाचित घरात शिरत होता, त्यावेळी त्याने कर्नलची टोपी पाहिली असेल. "चोरट्याची दिलगिरी त्याच्या माफीमध्ये दिसून आली. त्याने बायबलच्या त्या भागाचा उल्लेखही केला ज्यात चोरी करण्यास मनाई आहे असं पोलिसांनी सांगितले.
घटनेच्या वेळी सेवानिवृत्त कर्नल घरात नव्हते. कर्नल गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या कुटुंबासमावेत बहरीन येथे गेले आहेत. घटनेच्या दुसर्याच दिवशी जेव्हा नोकर घराची साफसफाई करायला गेला तेव्हा त्याला चोराने लिहिलेला माफीनामा दिसला. चोरट्याने लोखंडाच्या सहाय्याने घराचा दरवाजा तोडला असल्याचे उघड झाले. कर्नलच्या घरात चोरी करण्यापूर्वी त्याने आणखी बरीच घरे व दुकानांमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचं पोलिसांनी सांगितले
हिल पॅलेस पोलिस स्टेशनचे निरिक्षक जे आर कुमार म्हणाले की, चोरट्याने भिंतीवर घरातून एक कापड, 1500 रुपये आणि थोडी दारूची बॉटल चोरली आहे. मद्यपान केल्याने त्याला चोरी केल्याबद्दल पश्चात्ताप होऊ लागला असावा. कर्नलचे कुटुंबीय येईपर्यंत काय चोरी झाली आहे हे माहित असणे कठीण आहे. घरात सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे पण चोराचे चित्र स्पष्ट झालेले नाही असं त्यांनी सांगितले.