नवी दिल्ली, दि. 23- हातावर किंवा शरीराच्या इतर कुठल्याही भागावर टॅटू काढायची क्रेझ सध्या सुरू आहे. हौशीने लोक हे टॅटू काढून घेतात. पण हातावरील तोच टॅटू दिल्लीतील काही चोरांना महागात पडला आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. 21 ऑगस्ट रोजी सिंडिकेट बँकेत झालेल्या चोरीचं प्रकरण मुखर्जी नगर पोलिसांनी सोडवलं असून त्या चोरी प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरांच्या हातावर असलेले टॅटू पोलिसांना दिसले होते. त्या टॅटूच्या आधारे पोलिसांनी चोरांचा शोध लावला. या आरोपी चोरांकडून पोलिसांनी 2.20 लाख रूपयांची नाणी आणि बँकेची खिडकी कापण्यासाठी वापरण्यात आलेलं सामान जप्त केलं आहे. बँकेत चोरी करण्यासाठी आरोपींनी टीव्हीवरील क्राइम सीरियल पाहून बँकेत चोरी करण्याचा प्लॅन तयार केला होता. त्यानुसार त्यांनी बँक लुटली.
पोलिसांनी अटक केलेले सगळे आरोपी गाजियाबाद आणि अशोक नगरचे राहणारे आहेत. तीन जणांना अटक केली असून राहुल (वय 21 वर्ष), राहुल(वय 19 वर्ष), अनुज(वय 23 वर्ष) अशी त्यांची नावं आहेत. आरोपी बस डेपोमध्ये बसच्या मेन्टनन्सचं काम करायचे. बस डेपोजवळत सिंडिकेट बँक आहे. याच बँकेत त्या तीघांनी चोरी केली होती. बँकेतील खिडकीला असलेली जाळी कापून हे तीघं बँकेत घुसले आणि त्यांनी 2.30 लाख रूपयांची नाणी घेऊन ते फरार झाले, अशी माहिती डीसीपी मिलिंद डुंबरे यांनी दिली आहे.
मुखर्जी नगरचे एसएचओ अनिल कुमार चौहान यांनी बँकेतून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली होती. ज्या मध्ये एका आरोपीच्या हातावर टॅटू दिसला. बँकेला लागूनच असणाऱ्या डेपोमधून बँकेत जाण्याचा रस्ता आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयितांची चौकशी केली. तेव्हा डेपोमध्ये काम करत असणाऱ्या राहुलच्या हातावरील टॅटू पोलिसांनी ओळखला. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. संपूर्ण तपासानंतर या आरोपींना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि अनुज बस डेपोमध्ये गेल्या चार महिन्यापासून काम करत आहेत. तर दुसरा आरोपी राहुल हा सहा महिन्यापासून डेपोमध्ये काम केल्यानंतर तो जीटीच्या बस डेपोमध्ये काम करत होता.