ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - फिल्मी स्टाईनले एटीएम कॅश व्हॅन लुटल्यानंतर फरार झालेल्या चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. लूट केल्यानंतर हे सर्व चोर हरिद्वारला पळून गेले होते. पण नोटांमध्ये चीप असल्याच्या भीतीने या चोरांनी पैसे खर्च केले नाहीत, आणि दिल्लीला जेव्हा परतले तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक केली.
19 डिसेंबर रोजी तीन तरुणांनी एटीएम कॅश व्हॅन लुटली होती. लूट करणारे तिन्ही आरोपी बिट्टू, रोहित नागर आणि सनी शर्मा यांना पोलिसांनी अटक केली आहे. लुटलेली रक्कम 9.5 लाख रुपयेही त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. या चोरीचा मास्टरमाइंड बिट्टू होता, ज्याने सनी आणि रोहितला यासाठी आपल्यासोबत घेतलं होतं. लूट करण्यासाठी त्यांनी सिव्हील लाईन परिसरातून एक दुचाकीही चोरी केली होती. बिट्टूने आपल्या ओळखीने या गाडीची नंबर प्लेटही बदलून ठेवली होती.
लूट करण्याआधी तिघांनीही एटीएममध्ये कॅश भरणा-या वेगवेगळ्या गाड्यांवर पाळत ठेवली होती. गाडी निघाल्यानंतर ती कोणत्या रस्त्याने जाते, गाडीसोबत किती सुरक्षारक्षक असतात, कॅश भरताना गाडी कुठे उभी असते, किती वेळ असते या सर्व छोट्या गोष्टींचं या चोरांनी निरीक्षण केलं होतं. त्यानंतर सुरक्षित ठिकाण पाहून त्यांनी लूट करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार 19 डिसेंबरला त्यांनी एटीएम कॅश व्हॅन लुटली.
याअगोदरही तीन वेळा त्यांनी प्रयत्न केला, पण गर्दी असल्याने काढता पाय घ्यावा लागला. शेवटी प्रतापगंज क्राँसिंगवर त्यांनी लूट केली आणि फरार झाले. घटनेनंतर बाईक निर्जनस्थळी सोडून तिघे रिक्षाने आपापल्या घऱी पोहोचले, आणि दुस-या दिवशी हरिद्वारसाठी निघून गेले. टीव्ही चॅनेल्सवर नोटांमधील जीपीएससंबंधी बातमी वाचली तेव्हा त्यांनी घाबरुन पैसे खर्चच केले नाहीत आणि दिल्लीला निघून आले. घटनेचा तपास करणा-या पोलिसांना खबर लागताच तिघांना अटक करण्यात आली.