महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या रविवारी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अजितदादांसह नऊ जणांनी भाजपा शिवसेना युतीसरकारमध्ये सहभागी झाले. यावेळी अजित पवारांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर उर्वरित बंडखोर आठ आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणातील भूकंप आता इतर राज्यांतही पोहोचू लागला आहे.
आगामी काळात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचाही शरद पवारांप्रमाणेच 'खेला' होऊ शकतो, असा दावा पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष सुकांता मजुमदार (Sukanta Majumdar) यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांता मजुमदार म्हणाले, "शरद पवारांना आपल्या मुलीला राजकारणात आणायचे होते. त्यामुळे पक्षाचे जुने दिग्गज नेते आणि अजित पवार नाराज झाले. त्यामुळे ते एनडीएमध्ये सहभागी झाले. अशा प्रकारे पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी यांना आपला पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांना राजकारणात आणायचे आहे. त्यामुळे स्वत:च्या हाताने पक्ष वाढवणारे तृणमूल काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते नाराज आहेत. या पंचायत निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या पक्षाचा पराभव होईल आणि तशा प्रकारे (महाराष्ट्राचे राजकारण) पश्चिम बंगालमध्येही होणार आहे."
महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी २ जुलै रोजी बंडखोरी केली. अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे गट-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. या बंडानंतर अजित पवार थेट उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. विशेष म्हणजे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासोबत अन्य ९ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याशिवाय, अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे ३० पेक्षा अधिक आमदार असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी या अजित पवारांसह नऊ आमदारांच्या बंडाला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर शरद पवार यांनी सोमवारी(दि.३) यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. तसेच बंड केलेल्या नेत्यांविरोधात रणशिंग फुंकले आहे. याआधी अजित पवार यांनी २०१९ च्या सुरुवातीला अशाच प्रकारचे बंड केले जाते. त्या बंडाला महाराष्ट्राच्या राजकारणात 'पहाटेचा शपथविधी' म्हणून ओळखले जाते. तेव्हा अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली होती. मात्र, त्यावेळी शरद पवार यांनी अजित पवारांचे बंड अवघ्या तीन दिवसांत मोडून काढले होते. तेव्हा सुद्धा भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत.