नवी दिल्ली - दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी आता विशेष प्रशिक्षित एनएसजीचे ब्लॅक कॅट कमांडो लवकरच जम्मू काश्मीरमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. काश्मीर खोऱ्यातील चकमकी आणि लोकांना ओलीस ठेवण्याच्या परिस्थितीत हे कमांडो सुरक्षा दलांची मदत करतील. गृहमंत्राल काश्मीर खोऱ्यात राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) चे पथक तैनात करण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. जेणेकरून घातक दहशतवादी कारवायांसारख्या घटना घडल्यावर ते लष्कर, सीआरपीएफ आणि राज्य पोलिसांच्या सोबत मिळून काम करू शकतील. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही काश्मीरमध्ये एनएसजी पथक तैनात करण्याची योजना आखत आहोत. त्यांना लोकांना ओलीस ठेवण्याच्या किंवा दहशतवादी हल्ल्यासारख्या घटनांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे. जम्मू काश्मीर पोलिसांचे महानिर्देशक एसपी वैद्य यांनीही अशा प्रस्तावावर काम सुरू असल्याच्या वृत्तास नुकताच दुजोरा दिला होता. मात्र ब्लॅक कॅट मकांडो तैनात करण्यात आल्याची ही पहिलीच घटना नसेल. याआधीही काश्मीरमध्ये ब्लॅक कॅट कमांडो तैनात करण्यात आले होते.
काश्मीरमध्ये तैनात होणार दहशतवाद्यांचे कर्दनकाळ, ब्लॅक कॅट कमांडोंच्या तैनातीबाबत विचार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 9:44 PM