मुंबई : बहुचर्चित आणि वेगवान अशी तिसरी राजधानी एक्स्प्रेस १६ आॅक्टोबरपासून धावणार आहे. मुंबई-दिल्ली मार्गावर आठवड्यातील तीन दिवस ही ट्रेन धावणार आहे. या राजधानी एक्स्प्रेसमुळे मुंबई-दिल्ली हे १ हजार ३६५ किलोमीटरचे अंतर १३ तास ५५ मिनिटांत पूर्ण करता येईल. नवीन एक्स्प्रेसमध्ये सेकंड वातानुकूलित ७०० ते ८०० आणि तृतीय वातानुकूलितसाठी ५०० ते ६०० रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या धावत असलेल्या राजधानीच्या तुलनेत १९ टक्के भाडे कमी असणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी यांच्यातील अंतर जलद गतीने पूर्ण करण्यासाठी नवीन राजधानी एक्स्प्रेस आणण्यात आली. नव्या एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यासाठी आधुनिक डब्ल्यूएपी ५ श्रेणीतील २ इंजिन जोडण्यात येणार आहेत. दोन्ही इंजिन ५ हजार ४०० अश्वशक्ती आहे. यांची कमाल वेगमर्यादा १३० किलोमीटर प्रतितास आहे.एक प्रथम वातानुुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, १२ तृतीय वातानुकूलित आणि एक पेन्ट्री बोगी असे स्वरूप विशेष राजधानीचे असणार आहे. नवीन एक्स्प्रेसचे तिकीट दर बदलत्या दरांनुसार आकारले जाणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.विशेष राजधानी एक्स्प्रेसनुसार मुंबई-दिल्ली हे अंतर १३ तास ५५ मिनिटांत पूर्ण करण्यात येणार आहे. एकच रेक असल्यामुळे आठवड्यातून तीन दिवस ही गाडी धावणार आहे. सध्या धावत असलेल्या राजधानी एक्स्प्रेसला मुंबई-दिल्ली हे अंतर पूर्ण करण्यासाठी १५ तास ५० मिनिटांचा वेळ लागत आहे. सद्यस्थितीत मुंबई-दिल्ली मार्गावर २ राजधानी एक्स्प्रेससह ३० मेल एक्स्प्रेस धावतात.विशेष राजधानी मुंबई-दिल्लीवांद्रे टर्मिनस येथून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दिल्लीच्या दिशेने ही गाडी मार्गस्थ होणार आहे. दुपारी ४.०५ मिनिटांनी ही राजधानी सुटणार असून, दुसºया दिवशी सकाळी ६ वाजता हजरत निजामुद्दीन (दिल्ली) स्थानकावर पोहोचणार आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर धावणार तिसरी ‘राजधानी’, मुंबई-दिल्ली प्रवास आणखी जलद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 4:19 AM