Wayanad Landslides : "मेरे प्यारे वायनाड में..."; भूस्खलनानंतर चिमुकल्याच्या पत्राने जिंकलं इंडियन आर्मीचं मन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 16:52 IST2024-08-04T16:21:25+5:302024-08-04T16:52:16+5:30
Wayanad Landslides : तिसरीतल्या एका चिमुकल्याने इंडियन आर्मीला पत्र लिहिलं आहे

Wayanad Landslides : "मेरे प्यारे वायनाड में..."; भूस्खलनानंतर चिमुकल्याच्या पत्राने जिंकलं इंडियन आर्मीचं मन
केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनामुळे मोठं नुकसान झालं आहे. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. तिसरीतल्या एका चिमुकल्याने इंडियन आर्मीला पत्र लिहिलं आहे. केरळमधील शाळेत शिकणाऱ्या रेयानने हे पत्र मल्याळममध्ये सैनिकांना लिहिलं आहे. रेयानच्या या पत्राला इंडियन आर्मीने उत्तर दिलं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पत्रावर युजर्स प्रतिक्रिया देत आहेत.
रेयानने पत्रात लिहिलं आहे की, "डियर इंडियन आर्मी, माझ्या आवडत्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे मोठा विध्वंस झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना तुम्ही वाचवत असलेलं पाहून मला खूप अभिमान आणि आनंद झाला. तो व्हिडीओ पाहिला ज्यात तुम्ही तुमची भूक भागवण्यासाठी बिस्किटं खात आहात आणि पूल बांधत आहात. या दृश्याने मला खूप प्रभावित केलं आणि प्रेरणा दिली. मीही एक दिवस सैन्यात भरती होऊन माझ्या देशाचं रक्षण करेन."
इंडियन आर्मीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर रेयानचे पत्र शेअर केले आहे. पत्र शेअर करताना त्यांनी लिहिलं की, "डियर रेयान, तुझ्या हृदयातून आलेले शब्द आम्हाला खूप भावले आहेत. संकटकाळात आशेचा किरण बनणे हे आमचे ध्येय आहे आणि तुझं पत्र आमच्या ध्येयाची पुष्टी करत आहे. तुझ्यासारखे हिरो आम्हाला आमचं सर्वोत्तम देण्यासाठी प्रेरणा देतात. आम्ही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत जेव्हा तू आर्मीचा युनिफॉर्म परिधान करून आमच्यासोबत उभा राहशील. आपण एकत्र उभं राहू आणि देशाला अभिमान वाटावा यासाठी काम करू. तरुण योद्धा, तुझ्या धैर्याबद्दल आणि प्रेरणेबद्दल धन्यवाद."
केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनामुळे मोठे नुकसान झालं आहे. वायनाडमधील मृतांची संख्या ३५८ वर पोहोचली आहे. इस्रोने सॅटेलाईट फोटो घेऊन केरळमधील १३ फुटबॉल स्टेडियम मैदानाइतके क्षेत्र उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. वायनाडमध्ये इंडियन आर्मीकडून सातत्याने बचावकार्य सुरू आहे.