नवी दिल्ली : कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेत प्रभावी ठरलेल्या कोव्हॅक्सिन या भारत बायोटेकच्या लसीच्या तिसऱ्या डोससाठी चाचण्या घेण्याला औषध महानियंत्रकांनी मान्यता दिली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या डोसमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढून ती कैक वर्षे टिकू शकेल, असा कयास आहे. कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसची चाचणी गेल्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांदरम्यान करण्यात आली होती. तिसऱ्या डोसची चाचणी स्वयंसेवकांवर करण्यासाठी परवानगी द्यावी, अशा आशयाचा प्रस्ताव भारत बायोटेकतर्फे देण्यात आला होता. त्यावर महानियंत्रकांच्या विषयतज्ज्ञ समितीने सकारात्मकता दर्शवली आहे. या स्वयंसेवकांना तिसरा डोस दिल्यानंतर त्यांच्यावर पुढील सहा महिने लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासंदर्भातील अहवाल भारत बायोटेकला वेळोवेळी सादर करावा लागणार आहे. कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस १९० स्वयंसेवकांना देण्यात आला होता. आताही या स्वयंसेवकांची दोन गटांत विभागणी केली जाईल. त्यातील एका गटाला लसीचा तिसरा डोस मिळेल, ज्यातून रोग प्रतिकारशक्ती वाढीस लागेल. त्यांचा अभ्यास करून मग अहवाल सादर केला जाईल. (वृत्तसंस्था)
CoronaVirus News: कोव्हॅक्सिन: तिसऱ्या डोसला चाचण्यांसाठी मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 5:49 AM