लखनौ : बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार आणि लालुप्रसाद यादव यांची महाआघाडी आणि भाजपाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत खरी लढत होण्याची चिन्हे असतानाच आता समाजवादी पार्टीच्या नेतृत्वातील तिसऱ्या आघाडीनेही या रणसंग्रामात उडी घेतली आहे.उत्तर प्रदेशातील सत्ताधारी सपाने बिहार विधानसभा निवडणुकीत समाजवादी जनता दल-लोकशाही (एसजेडीडी), राष्ट्रवादी काँग्रेस (राकाँ) आणि पी. ए. संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीला सोबत घेऊन तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याची घोषणा गुरुवारी केली.सपाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी या पक्षांच्या नेत्यांसोबत एका संयुक्त पत्रपरिषदेत ही माहिती दिली. एसजेडीडीचे नेते माजी केंद्रीय मंत्री देवेंद्रप्रसाद यादव यांनी सांगितले, की तिसऱ्या आघाडीच्या समन्वय समितीची बैठक शुक्रवारी पाटण्यात होणार असून, या वेळी पहिल्या टप्प्यातील जागांसाठी उमेदवारांचा निर्णय घेतला जाईल. पहिल्या टप्प्यातील ४९ जागांसाठी नामांकनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. -पाच टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकीत बिहार विधानसभा २४३ जागांसाठी १२, १६ आणि २८ आॅक्टोबर, १ व ५ नोव्हेंबरला मतदार होणार आहे. या निवडणुकीत रालोआचे नेतृत्व करीत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाआघाडीची धुरा सांभाळणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या लोकप्रियतेचा कस लागणार आहे.
बिहारच्या रिंगणात तिसऱ्या आघाडीची उडी
By admin | Published: September 18, 2015 2:30 AM