तिसऱ्या यादीत दलित, मुस्लिम उमेदवारांना संधी; काँग्रेसचे आतापर्यंत ८८ उमेदवार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 05:39 AM2018-11-19T05:39:29+5:302018-11-19T05:40:03+5:30
तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आणखी १३ जणांची तिसरी यादी जाहीर केली आहे.
- धनाजी कांबळे
हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आणखी १३ जणांची तिसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने आतापर्यंत ९४ पैकी ८८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात दलित, आदिवासी आणि मुस्लिमांना संधी देण्यात आली आहे.
तसेच तेलंगणा जन समितीचे अध्यक्ष एम. कोडनदरम यांना जनगाव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता. मात्र, प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष पोनाला लक्षमैय्या यांना या मतदारसंघातून तिकीट देण्यात आल्याने काँग्रेस आघाडीतील टीजेएसचे नेते कोडनदरम यांना दुस-या मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने जाहीर केलेल्या तिस-या यादीत एससी, एसटी, बीसी, मुस्लीम आणि रेड्डी समाजाच्या उच्छुकांना संधी देण्यात आली आहे. विशेषत: अबिद रसूल खान यांनी टिका केली होती की, प्रामाणिक आणि निष्ठावान मुस्लिम कार्यकर्त्यांना डावलून पोपटपंची करणाºयांना उमेदवारी दिली आहे. तसेच या मुद्यावर त्यांनी काँग्रेसला
सोडचिठ्ठी देऊन टीआरएसमध्ये प्रवेश केल्यानंतर तिसºया यादीत तीन मुस्लिम उमेदवारांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसने लक्षमैय्या यांच्यासह माजी मंत्री सोयम बापू राव, माजी आमदार डी. सुधीर रेड्डी, प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अदंकी दयाकर यांनाही उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, भाजपने सात जणांची चौथी यादी जाहीर केली असून, आतापर्यंत ९३ जणांची नावे जाहीर केली आहेत.
४३ गुन्हे, तरी रिंगणात
भाजपचे नेते राजा सिंग हे वादग्रस्त आणि भडकाऊ भाषण करण्यासाठी प्रसिद्ध असून, ते सध्या निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्यावर ४३ फौैजदारी गुन्हे दाखल असून, त्यांच्याकडे २.८७ कोटींची संपत्ती असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. घोशामल मतदारसंघातून ते पुन्हा निवडणूक लढवीत आहेत.