लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. भाजपाने या उमेदवारी यादीमधून तामिळनाडूमधील ९ उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामध्ये तामिळनाडूमधील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांचाही समावेश आहे. तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या ३९ जागा असून, येथे डीएमकेच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी आणि एआयएडीएमके यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे. तर भाजपा आणि मित्रपक्षांची एनडीए या दोन्ही आघाड्यांना आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहे.
भाजपाने चेन्नई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपाने तमिलसाई सुंदरराजन यांना उमेदवारी दिली आहे. तर चेन्नई मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपाने विनोज पी. सेल्वम यांना उमेदवारी दिली आहे. वेल्लोर येथून ए. सी. षण्मुगम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कृष्णगिरी लोकसभा मतदारसंघामधून भाजपाने सी. नरसिम्हन यांना उमेदवारी दिली आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या निलगिरी लोकसभा मतदारसंघामधून भाजपाकडून एल. मुरुगन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपाचे तामिळनाडूमधील प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांना कोईंबतूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पेराम्बलूर लोकसभा मतदारसंघातून टी. आर. पलिवेंदर यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. तूतुक्कूडी लोकसभा मतदारसंघामधून एन. नागेंद्रन यांना उमेदवारी दिली आहे. तर कन्याकुमारी लोकसभा मतदारसंघातून भाजपाने माजी खासदार पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. राधाकृष्णन यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विजय मिळवला होता.
दोन लोकसभा निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपाला तामिळनाडूच्या राजकारणात अद्याप पाय रोवता आलेले नाहीत. मात्र यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि के. अन्नामलाई यांच्या नेतृत्वाखालील प्रचारसभांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे येथे चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा भाजपाला आहे.