अहमनदगर : राज्यातील पोलीस भरतीचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. तिसर्या टप्प्यातील भरती प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यात किंवा त्यानंतर होईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, पोलीस दलातील नव्या भरतीमुळे व्यवस्थेवरील ताण हलका होण्यास मदत होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. रविवारी सायंकाळी माध्यमांशी बोलताना राम शिंदे म्हणाले, सरकारने ६० हजार जवानांच्या भरतीसाठी परवानगी दिलेली आहे. त्यासाठी एकूण ५ टप्प्यांत भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या भरतीतील दोन टप्पे पूर्ण झालेले आहेत. त्यातून २० हजार पोलीस जवानांची भरती झालेली आहे. आता तिसर्या टप्प्यातील भरतीसाठी तयारी केली जात आहे. मात्र ही प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये किंवा त्यानंतरच होईल. या टप्प्यात साधारण १० ते १२ हजार तरुणांसाठी पोलीस दलातील सेवेची संधी मिळणार आहे. नियमांच्या काटेकोर पालनासह या प्रक्रिया राबविल्या जातील. ताज्या दमाचे जवान पोलीस दलात आल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्याचा फायदा होईल. यामुळे पोलीस दलावरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल.
ऑक्टोबरमध्ये पोलीस भरतीचा तिसरा टप्पा
By admin | Published: April 20, 2015 1:41 AM