नवी दिल्ली : देशामध्ये येत्या सहा ते आठ आठवड्यांच्या आत कोरोना साथीची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असे ‘एम्स’चे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. प्रतिबंधक निर्बंध शिथिल केल्यानंतर लोक पुन्हा निष्काळजीपणे वावरू लागले आहेत, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
गुलेरिया यांनी सांगितले की, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या कालावधीत लोकांनी प्रतिबंधक नियमांचे नीट पालन केले नाही. या हलगर्जीपणामुळे कोरोना संसर्गास अधिक वाव मिळाला व रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्यानंतर बहुतांश लोक प्रतिबंधक नियम नीट पाळताना दिसत नाहीत. अनेक ठिकाणी पुन्हा गर्दी दिसू लागली आहे. असेच चित्र राहिले तर ही साथ आणखी वेगाने पसरू शकते.
येत्या सहा ते आठ आठवड्यांत किंवा त्यानंतर काही दिवसांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.दुसऱ्या लाटेत सर्वच आरोग्यसेवेवर कमालीचा ताण वाढला होता. या स्थितीत भारताला मदत करण्यासाठी अनेक देश पुढे आले. अनेक राज्यांनी आता प्रतिबंधक नियम शिथिल केले. मात्र, त्याचबरोबर तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी पूर्वतयारीही सुरू केली आहे.
केंद्र सरकार सतर्क
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होणार नाही, असे सांगितले जात असले तरी केंद्र सरकार सतर्क आहे. n लहान मुलांच्या शुश्रूषेसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे.