नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसºया लाटेनंतर तिसरी लाट येणे अटळ आहे. मात्र ती केव्हा येणार हे निश्चित सांगता येणार नाही असा दावा केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार व ख्यातनाम शास्त्रज्ञ के. विजयराघवन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, कोरोनाच्या नव्या लाटा येणार असून त्याचा मुकाबला करण्यासाठी देशाने सज्ज झाले पाहिजे.
के. विजयराघवन यांनी सांगितले की, देशात लसीकरण मोहिमेत देण्यात येत असलेल्या लसी सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोना विषाणूंवर प्रभावी आहेत. मात्र कोरोनाच्या नव्या प्रकारच्या विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी अधिक प्रभावी लसी तयार करणेही आवश्यक आहे. देशात सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांमुळे संसर्गात तसेच रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्याचा देशातील आरोग्य व्यवस्थेवर ताण आला. ते म्हणाले की, कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांबद्दल जगभरातील शास्त्रज्ञ संशोधनाचे निकष पाळून कमी वेळेत औषधे, लसी तयार करण्याच्या प्रयत्नांत आहेत.हर्ड इम्युनिटीपासून भारत दूरच
भारतामध्ये सामुहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याइतकी स्थिती अजून आलेली नाही. देशातील ५०ते ६० टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज तयार झालेल्या असतील तर सामुहिक प्रतिकारशक्ती निर्माण होऊ लागते. मात्र भारतात अद्याप ती वेळ आलेली नाही असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.