नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. केरळ आणि देशातील काही राज्यांमध्ये कोरोनामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात म्हणून या संक्रमणाच्या वाढलेल्या आकड्याकडे पाहिलं जात असल्याचं म्हटलं आहे. याच दरम्यान सरकारकडून आरोग्यव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनीही या कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं आहे. तसेच कोरोना संक्रमणाची तिसरी लाट रोखण्यासाठी किंवा त्याचा परिणाम कमीत कमी व्हावा यासाठी संभाव्य प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याची आवश्यकता आहे. याचाच एक भाग म्हणून देशात कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला जात आहे. देशाला प्रशिक्षित डॉक्टर आणि नर्सेस सोबतच चाचणी सुविधांची आणखी गरज भासू शकते, असं सांगतानाच लहान आणि मध्यम दर्जाच्या शहरांत रुग्णालयांची क्षमता वाढवण्याची गरजही अर्थमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. कोरोनामुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी आरोग्य सुविधा मजबूत करण्याच्या संदर्भात एका वेबिनारला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं आहे.
"देशात सध्या एक हजार व्यक्तींमागे फक्त एक बेड"
वेबिनारमध्ये बोलताना, नीती आयोगाचे सदस्य आणि कोरोनाशी निगडीत टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. व्ही के पॉल यांनी रुग्णालयात रुग्णांसाठी बेडची संख्या खूपच कमी असल्याची उणीव व्यक्त केली. तुलनात्मक आकडा देताना डॉ. पॉल यांनी देशात सध्या एक हजार व्यक्तींमागे फक्त एक बेड उपलब्ध असणं ही चिंतेची बाब असल्याचं म्हटलं आहे. हजार व्यक्तींमागे कमीत कमी दोन बेड उपलब्ध असणं गरजेचं असल्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. सध्या बेडसची संख्या जवळपास 12 लाख आहे ही संख्या 24-25 लाखांपर्यंत नेण्याची गरज डॉ. पॉल यांनी व्यक्त केली.
"कोरोना परिस्थितीच्या सुरुवातीपासूनच आरोग्य व्यवस्था वाढवण्याचा प्रयत्न"
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सरकारकडून कोरोना परिस्थितीच्या सुरुवातीपासूनच आरोग्य व्यवस्था वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं म्हटलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल सात दशकांत देशातील रुग्णालयात जवळपास 16 हजार व्हेंटिलेटरची सुविधा होती तिथेच गेल्या दीड वर्षांत ही संख्या 60 हजारांहून अधिक करण्यात आल्याचं राजेश भूषण यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 3,28,10,845 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 41,965 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 460 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,39,020 लोकांना जीव गमवावा लागला आहे.