अयोध्या : अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या भव्यदिव्य मंदिराची उभारणी देशभरातील तब्बल १२ कोटी ७३ लाख ४ हजार कुटुंबांनी दिलेल्या आर्थिक योगदानातून केली जात आहे. ५ लाख ३७ हजार १९ गावांमधून त्यासाठी निधी संकलन करण्यात आले होते.
१५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२१ दरम्यान २२ लाख कार्यकर्त्यांनी हा निधी गोळा केला होता, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री कोटेश्वर यांनी दिली. कोणतीही संस्था वा कंपनीकडून आर्थिक योगदान घ्यायचे नाही, व्यक्ती म्हणूनच देणगी स्वीकारायची हे तत्त्व पहिल्या दिवशीपासून स्वीकारण्यात आले होते. मंदिरासाठी आजवर जमा झालेल्या प्रत्येक पैशाचा हिशेब पारदर्शक पद्धतीने ठेवला आहे, असे त्यांनी सांगितले.
कोटेश्वर यांनी सांगितले की, या संपूर्ण परिसराचे संचालन करणाऱ्या भवनाला दिवंगत अशोक सिंघल यांचे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक नगरात १२ हजार लिटर पाण्याची व्यवस्था केली आहे. भोजनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. चार हजारावर संतमहंतांच्या निवासाची व्यवस्था या ठिकाणी आहे. १४०० खोल्या तयार करण्यात आल्या आहेत.
तीर्थक्षेत्रपुरममध्ये सुसज्जतातीर्थक्षेत्र पूरमची उभारणी आता अंतिम टप्प्यात आहे. ही एक टेंट सिटी आहे. शेकडो तंबू या ४५ एकर परिसरात उभारण्यात आले आहेत. एकूण सहा नगरांची उभारणी करण्यात आली असून या नगरांना परमहंस रामचंद्र दास, गोरक्ष पीठाधीश्वर महंत अवैद्यनाथ, बाबा राम अभिलाष दास वामदेव जी महाराज, मोरोपंत पिंगळे आणि ओंकार भावे यांची नावे देण्यात आली आहेत.