Lok Sabha Election Result 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अतिशय धक्कादायक निकाल लागले आहेत. 400 पारची घोषणा करणाऱ्या भाजपला 300 चा आकडाही पार करता आलेला नाही. देशभरातील अनेक महत्वाच्या जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. तसेच, अनेक केंद्रीय मंत्र्यांनाही मोठ्या मताधिक्याने पराभावाचा सामना करावा लागला आहे. अशातच, केरळमधील हॉट सीट असलेल्या तिरुवनंतपुरमचे (Thiruvananthapuram) निकाल समोर आले आहेत.
तिरुअनंतपुरम मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी सलग चौथा विजय मिळवला. या जागेवरुन त्यांच्याविरोधात मोदी सरकारमधील मंत्री राजीव चंद्रशेखर होते. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये चंद्रशेखर यांनी चांगली आघाडी मिळवली होती. थरुर यांचा पराभव होणार, अशी चर्चाही रंगू लागली. पण, नंतरच्या फेऱ्यांमध्ये थरुर यांनी मुसंडी मारली आणि अखेर विजय खेचून आणला.
विजयानंतर शशी थरुर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "आजच्या निकालावरुन भाजपचा जोरदार संदेश मिळाला आहे की, केरळमध्ये जात फॅक्टर चालणार नाही. मी आधीच सांगितले होते की, एक्झिट पोल निकालाशी जुळणार नाहीत. आम्हाला जे परिणाम मिळत आहेत, ते आम्ही प्रचारादरम्यान पाहिलेल्या परिणामांच्या जवळपास आहेत. माझ्यासाठी अखेरपर्यंत ही अतिशय खडतर लढत होती. एवढी चांगली लढत दिल्याबद्दल राजीव चंद्रशेखर आणि पन्नियान रवींद्रन या दोघांचेही अभिनंदन केले पाहिजे. मला आनंद आहे की, शेवटी येथील मतदारांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला."