तिरुअनंतपुरम - 'हिंदू पाकिस्तान' संदर्भात केलेल्या विधानावरुन सुरू झालेला वाद अद्याप मिटलेला नसतानाही काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी पुन्हा एकदा हिंदुत्ववादावरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ''भाजपा आणि आरएसएस हिंदुत्वाला तालिबानच्या मार्गावर नेत आहेत'',अशी वादग्रस्त आणि जहरी टीका शशी थरुर यांनी मंगळवारी (16 जुलै) केली.
तिरुअनंतपुरममधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना थरुर म्हणाले की, भाजपाचे लोक मला पाकिस्तानमध्ये जाण्यास सांगत आहेत. मी त्यांच्याप्रमाणे हिंदू नाही हे सांगण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? मला देशात राहण्याचा अधिकारी नाही का? या लोकांनी हिंदुत्वाचे तालिबानीकरण सुरू केले आहे का?, असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करत थरुर यांनी भाजपा/ आरएसएसवर हल्लाबोल चढवला. यामुळे वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, लोकसभा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आले तर भारताचा ‘हिंदू पाकिस्तान’ होईल, असे विधान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी(16 जुलै) शशी थरुर यांच्या येथील मतदारसंघ कार्यालयात गोंधळ घातला.‘हिंदू पाकिस्तान’चे कार्यालय असा फलक लावून त्यांना मी पाकिस्तानात निघून जावे, अशा घोषणाही दिल्या, अशी माहिती थरुर यांनी ट्विटद्वारे दिली.
...तर भारताचा 'हिंदू पाकिस्तान' होईल- थरुर
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयी झाल्यास देशाचा हिंदू पाकिस्तान होईल, असे विधान शशी थरुर यांनी केले होते. 'भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास नव्यानं घटना लिहिली जाईल. त्यामुळे भारतामधील परिस्थिती पाकिस्तानसारखी होईल. मग या देशात अल्पसंख्याकांच्या अधिकारांचा कोणताही सन्मान केला जाणार नाही,' असं थरुर म्हणाले होते.शशी थरुर यांनी कडव्या हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपाला लक्ष्य केलं. 'ते (भाजपा) पुन्हा लोकसभा निवडणूक जिंकले तर, आपल्या देशातील लोकशाही व्यवस्था संपेल. त्यांच्याकडून घटना उद्ध्वस्त केली जाईल. त्यांची नवी घटना हिंदू राष्ट्राच्या सिद्धांतावर आधारित असेल. त्यामुळे अल्पसंख्याकांचे अधिकार संपुष्टात येतील. देशाचा हिंदू पाकिस्तान होईल. महात्मा गांधी, नेहरु, सरदार पटेल, मौलाना आजाद आणि स्वातंत्र्यासाठी झटलेल्या अनेक महान व्यक्तींनी अशा देशासाठी संघर्ष केला नव्हता,' अशा शब्दांमध्ये थरुर यांनी भाजपाला लक्ष्य केले होते.