लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या फौजदारी खटल्यांचा तपशील त्यांच्या अधिकृत वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावर त्यांच्या निवडीच्या कारणासह प्रसिद्ध करावा याची खात्री करण्यासाठी निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने सोमवारी फेटाळली.
न्यायमूर्ती एस. के. कौल आणि न्यायमूर्ती अभय एस. ओक यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला आपली याचिका निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यास सांगितले. “सर्वोच्च न्यायालय म्हणजे फिरायला जाण्याचे ठिकाण नाही. याचिकेद्वारे जी मागणी करण्यात आली आहे ती, या न्यायालयाच्या पूर्वीच्या निकालाची अंमलबजावणी आहे. याचिकाकर्त्याने आयोगाकडे जाणे आवश्यक आहे,” असे म्हणत खंडपीठाने याचिका फेटाळली आहे.
काय होते याचिकेत?ॲड. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेत राजकारण्याने इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडियावर गुन्ह्यांविषयक तपशील प्रकाशित केला आहे का, याची खात्री करण्यासाठी आयोगाला निर्देश देण्याची मागणी केली आहे. या निर्देशांच्या विरोधात जाणाऱ्या पक्षाच्या अध्यक्षाविरुद्ध अवमानाचा खटला दाखल करावा, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली होती.