ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 08:32 PM2024-05-09T20:32:23+5:302024-05-09T20:33:11+5:30
शहा म्हणाले, काँग्रेस म्हणते की मोदी आरक्षण संपवतील. मात्र, गेल्या 10 वर्षांपासून पूर्ण बहुमताने सत्तेत असतानाही त्यांनी असे काहीही केले नाही. पण, तेलंगणात काँग्रेसने मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देऊन अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहोचवला आहे.
संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबरकसून मैदानात उतरलेले आहेत. प्रचारादरम्यान नेतेमंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आता भारतीय जनता पक्षाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. "2024 ची लोकसभा निवडणूक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी आहे. यात सामना 'विकासासाठी मत' आणि ‘जिहादसाठी मत’ असा आहे. एवढेच नाही, तर ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘भारतीय गॅरंटी’ आणि राहुल गांधी यांची ‘चिनी गॅरंटी’ यात आहे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. ते गुरुवारी तेलंगणातील भोनगीर लोकसभा मतदारसंघात एका प्रचार सभेला संबोधित करत होते.
काँग्रेस, भारत राष्ट्र समिती (BRS) आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लीमीन (AIMIM) यांना 'तुष्टीकरणाचे त्रिकूट' संबोधत शाह म्हणाले, "हे पक्ष रामनवमीच्या मिरवणुका काढू देत नाहीत, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) विरोध करतात आणि हैदराबाद मुक्ती दिनही (17 सप्टेंबर) साजरा करू देत नाहीत. शरियत आणि कुराणच्या आधारे तेलंगण चालवण्याची यांची इच्छा आहे."
आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांत भाजप सुमारे 200 जागा जिंकेल, असा दावाही यावेळी शाह यांनी केला. ते म्हणाले, "पक्षाला 400 जागांचे लक्ष्य पार करण्यासाठी तेलंगणाला मतदान करावे लागेल. 2019 मध्ये तेलंगणातील लोकसभेच्या 17 पैकी चार जागा भाजपने जिंकल्या होत्या. आता या निवडणुकीत भाजप 10 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल हे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी समजून घ्यायला हवे. तेलंगणातील दोन अंकी जागा पंतप्रधान मोदींना 400 पार घेऊन जाईल."
शहा म्हणाले, काँग्रेस म्हणते की मोदी आरक्षण संपवतील. मात्र, गेल्या 10 वर्षांपासून पूर्ण बहुमताने सत्तेत असतानाही त्यांनी असे काहीही केले नाही. पण, तेलंगणात काँग्रेसने मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देऊन अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहोचवला आहे. भाजप सत्तेत आल्यास मुस्लिम आरक्षण संपवेल आणि एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण वाढवेल. मोदी जे बोलतात ते करतात. राहुलबाबांची गॅरंटी सूर्यास्तापर्यंतही टिकत नाही."