अनेकांच्या मनात देशसेवेची अशी तळमळ असते की ते त्यासाठी वाटेल ते करतात. अशीच प्रेरणादायी गोष्ट पंजाबमधील रहिवासी असलेल्या नवजोत सिमी यांची आहे. ज्यांनी मेडिकल करिअर सोडून नागरी सेवेत जाण्याचा मोठा निर्णय घेतला. नवजोत सिमी या २०१८ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.
नवजोत सिमी यांचा जन्म २१ डिसेंबर १९८७ रोजी पंजाबमधील गुरुदासपूर येथे झाला. सुरुवातीच्या शिक्षणानंतर, त्यांनी लुधियानाच्या बाबा जसवंत सिंह डेंटल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टीट्यूटमधून बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (बीडीएस) ची डिग्री घेतली. नवजोत यांच्या पुढे एक उत्तम करिअर होतं, पण त्यांना काहीतरी मोठं करायचं होतं.
UPSC तयारीचा टप्पा नवजोत यांच्यासाठीही सोपा नव्हता. त्यांनी दिवसरात्र अभ्यास केला. अभ्यासादरम्यानही त्या स्वतःला प्रेरित करत असे. त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं आणि त्यांनी पहिल्याच प्रयत्नात २०१८ मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. UPSC CSE परीक्षेत ७३५ रँक मिळवून नवजोत आयपीएस झाल्या.
नवजोत यांची पहिली पोस्टिंग पटना येथे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून झाली. कायदा आणि सुव्यवस्था, महिलांची सुरक्षा आणि मुलांच्या हक्कांसाठी त्या नेहमीच आवाज उठवतात. त्यांनी नेहमीच महिलांची सुरक्षा आणि मुलांच्या हक्कांना महत्त्व दिलं. एवढच नाही तर नवजोत सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. असंख्य लोक त्यांना आपला आदर्श मानतात.