वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावर बुधवारी दिवसभर संसदेमध्ये जोरदार चर्चा झाली. तसेच रात्री उशिरा त्यावर मतदान घेण्यात आले. तत्पूर्वी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया माध्यम एक्सवर एक जळजळीत पोस्ट लिहून या विधेयकाला तीव्र विरोध केला. सरकारने आणलेलं वक्फ बोर्ड संशोधन विधेयक हे मुस्लिमांना देशोधडीला लावणारं हत्यार असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधी यांनी आज वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत झालेल्या चर्चेत सहभाग घेतला नव्हता. मात्र त्यांनी ट्विट करत या विधेयकाविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली. त्यात राहुल गांधी यांनी लिहिलं की, वक्फ संशोधन विधेयक हे मुस्लिमांना देशोधडीला लावणारं आणि त्यांचे वैयक्तिक कायदे व मालमत्तेच्या अधिकारांना हडप करण्यासाठी तयार केलेलं हत्यार आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून मुस्लिमांना लक्ष्य करून घटनेवर हा हल्ला केला जात आहे. मात्र भविष्यात इतर समुदायांना लक्ष्य करण्यासाठी उदाहरण म्हणून याचा वापर केला जाईल, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.
दरम्यान, काँग्रेस पक्ष हा वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला विरोध करत आहे. कारण हे विधेयक भारताच्या मूळ संकल्पनेवर हल्ला करणारं आहे. तसेच कलम २५, धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचं उल्लंघन करतं, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.