"हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान", सरसंघचालक भागवत यांच्यावर विरोधकांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 18:03 IST2025-01-14T18:02:28+5:302025-01-14T18:03:55+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाचे राजकीय पडसाद उमटले आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेने (ठाकरे) भागवत यांच्या भूमिकेवर टीका केली आहे.

"हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान", सरसंघचालक भागवत यांच्यावर विरोधकांची टीका
'परकीय आक्रमण झेलणाऱ्या भारताला खरं स्वातंत्र्य तेव्हा मिळाले, जेव्हा राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाली', असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. त्यांच्या विधानावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा हा महत्त्वाचा दिवस आहे, पण खरं स्वातंत्र्य मिळालं म्हणणं हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान असल्याचे काँग्रेसने म्हटले आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेही यावरून टीका केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काँग्रेसचे नेते राशीद अल्वी म्हणाले, "भाजपच्या खासदार कंगना रणौतही असे म्हणाल्या होत्या की, देशाला स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळालं. त्यानंतर आता आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत म्हणत आहेत की, राम मंदिर बनल्यानंतर देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं. मग १५ ऑगस्ट १९४७ काय झालं होतं? २६ जानेवारी या दिवसाचे इतके महत्त्व का आहे? जर हे खरं स्वातंत्र्य आहे, तर मला हे म्हणताना वेदना होताहेत की, ते महात्मा गांधी आणि सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करत आहेत."
अल्वि पुढे म्हणाले की, "राम मंदिर बनने आणि त्यात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणे निश्चितच एक महत्वाचा दिवस आहे. याबद्दल अजिबात शंका नाही. पण, असं म्हणणं की, प्राण प्रतिष्ठा दिनीच खरे स्वातंत्र्य मिळाले, हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे."
ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मोहन भागवत यांना रामाच्या नावावर राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे.
"आरएसएस सरसंघचालक एक सन्मानीय व्यक्ती आहेत, पण ते संविधानाचे निर्माते नाहीत. ते या देशातील कायद्यांचा मसुदा तयार करत नाहीत, त्यात बदल करत नाहीत. रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणे, देशासाठी अभिमानाचा क्षण होता आणि मंदिर व्हावे म्हणून सगळ्यांनी योगदान दिले आहे. पण, असा दावा करणे की, देश आता स्वतंत्र झाला आहे, हे चुकीचे आहे. त्यांनी रामलल्लाच्या नावावर राजकारण करायला नको", असे संजय राऊत म्हणाले.
भारताने अनेक शतके आक्रमणे झेलली
मोहन भागवत म्हणाले होते की, मागील अनेक शतके भारताने परकीय आक्रमणांना तोंड दिलं. भारताला खरं स्वातंत्र्य मागच्या वर्षी अयोध्येमध्ये राम मंदिर बनल्यानंतर मिळालं. रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठेला एक वर्ष पूर्ण होत असून, हा दिवस प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरा केला पहिजे", असे विधान भागवत यांनी केले होते.