काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या आई सोनिया गांधी यांना नुकतंच एक कुत्र्याचं पिल्लू भेट दिलं होतं. त्यावरून आता वादाला तोंड फुटले आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या आईला भेट दिलेल्या कुत्र्याच्या पिल्लाचं नाव नुरी असं ठेवलं आहे. त्यावर असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) ने तीव्र आक्षेप घेतला आहे. एमआयएमचे उत्तर प्रदेशमधील प्रवक्ते मोहम्मद फरहान यांनी कुत्र्याच्या नावावरून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. इस्लाम धर्मामध्ये लाखो मुलींचं नाव हे नूरी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
एमआयएमचे नेते मोहम्मद फरहान यांनी सांगितले की, इस्लाम धर्मामध्ये नूरीचा अर्थ प्रकाश, उजेड किंवा चमकदार वस्तू असा होतो. कुठल्याही मुलीने जन्म घेतला की, कुठलंही कुटुंब आनंदाच्या प्रकाशात उजळून निघतं. तेव्हा तिचं नाव नूरी असं ठेवलं जातं. एमआयएमचे प्रदेश प्रवक्ते मोहम्मद फरहान यांनी पुढे सांगितले की, राहुल गांधी यांनी इस्लाम धर्माच्या लोकांना कमीपणा दाखवण्यासाठी आपल्या कुत्र्याचं नाव नूरी असं ठेवलं आहे. कुत्र्याचं नाव नूरी असं ठेवल्याने इस्लाम धर्मामधील लाखो मुलींचा अपमान झाला आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.
मोहम्मद फरहान यांनी आरोप केला की, गांधी कुटुंबीय मुस्लिमांकडे कोणत्या नजरेने पाहतं हे कुत्र्याच्या नूरी अशा केलेल्या नामकरणावरून दिसून येतं. राहुल गांधी यांनी यासाठी सार्वजनिकपणे माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
राहुल गांधी यांनी वर्ल्ड अॅनिमल डे निमित्त त्यांच्या आई सोनिया गांधी यांना एक कुत्रा भेट म्हणून दिला होता. राहुल गांधी यांनी हा कुत्रा गोवा येथून आणला होता. गांधी कुटुंबीयांनी या कुत्र्याचं नामकरण नूरी असं ठेवलं आहे. तसेच सोशल मीडियावर राहुल आणि सोनिया गांधी यांचा कुत्र्यासोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.