नवी दिल्ली - चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर मोहिमांचा मोठा अनुभव असलेले जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी रविवारी ३०वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. भारत वास्तविक नियंत्रण (एलएसी) सीमांवर असंख्य सुरक्षा आव्हानांना तोंड देत असताना द्विवेदी यांची या पदावर निवड झाली आहे. नवे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी व सध्याचे नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी हे दोघेही एकत्र शिकले आहेत, हा अनोखा योगायोग या निमित्ताने साधला गेला असून, असे देशात प्रथमच घडले आहे, हे विशेष.
जनरल मनोज पांडे चार दशकांच्या सेवेनंतर निवृत्त झाल्यानंतर जनरल द्विवेदी यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. ते १९ फेब्रुवारीपासून लष्कराचे उपप्रमुख म्हणून काम करत होते. उपप्रमुख होण्यापूर्वी ते २०२२ ते २०२४ या काळात उत्तरी कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून काम करत होते. जनरल द्विवेदी यांना सर्वांत प्रथम १९८४ मध्ये जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले होते. चीनशी चालू असलेल्या वाटाघाटींमध्ये ते सक्रियपणे सहभागी झाले होते.
मैत्रीचे बंध मजबूत, सातत्याने संपर्कातभारतीय लष्करी इतिहासात प्रथमच उपेंद्र द्विवेदी आणि ॲडमिरल दिनेश त्रिपाठी हे दोन वर्गमित्र लष्कर आणि नौदलाच्या प्रमुखपदी विराजमान झाले. दोघांनीही रीवा सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. १९७०च्या दशकाच्या सुरुवातीस ते इयत्ता पाचवी ‘अ’पासून शाळेत एकत्र होते. द्विवेदी यांचा हजेरी क्र. ९३१ आणि त्रिपाठींचा ९३८ होता. ते सैन्यात वेगवेगळ्या ठिकाणी असतानाही सतत संपर्कात राहिले.
जनरल मनोज पांडे यांंच्याकडून सूत्रे घेताना जनरल उपेंद्र द्विवेदी. उत्तर आर्मी कमांडर म्हणून द्विवेदी यांनी जम्मू-काश्मीरमधील गतिमान दहशतवादविरोधी कारवायांचे आयोजन करण्याबरोबरच उत्तर आणि पश्चिम सीमेवर सततच्या मोहिमांचे नियोजन व अंमलबजावणीसाठी धोरणात्मक मार्गदर्शन केले आहे.