अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसच्या अध्यक्षांनी नाकारले. यावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस सनातनविरोधी असल्याचा आरोप करत 'ही महात्मा गांधींची नव्हे, तर नेहरूंची काँग्रेस आहे,अशी टीका केली.
निकाल लागला, पण जुन्या फोटोने एकनाथ शिंदेंची कोंडी; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं घेरलं!
सुधांशू त्रिवेदी म्हणाले, 'काँग्रेस सनातनविरोधी आहे. आता ती मंदिरावर बहिष्कार घालत आहे. काँग्रेस पक्षाला काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही. भारताचा इतिहास जेव्हा वळण घेतो तेव्हा ते बहिष्कार टाकतात. जीएसटी लागू झाला तेव्हा त्यांनी बहिष्कार टाकला, भारतात जी-20 झाली तेव्हा त्यांनी राष्ट्रपतींच्या मेजवानीवर बहिष्कार टाकला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला. प्रणव मुखर्जी यांच्या भारतरत्न कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. आज जेव्हा रामलल्ला विराजमान होणार आहेत. ५०० वर्षांच्या संघर्षानंतर ही संधी चालून आली आहे, तेव्हा काँग्रेस त्यावर बहिष्कार टाकत आहे.
'सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी झाली तेव्हा नेहरूंनी केवळ सहभाग घेतला नाही, तर लिहिलेले पत्र सर्वश्रुत आहे. इंदिराजींच्या काळात गोसेवकांवर गोळ्या झाडल्या गेल्या. सोनियांच्या काळात राम हे काल्पनिक ठरवले गेले, असा आरोपही सुधांशू त्रिवेदी यांनी केला.
'मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांनी राम मंदिरातील राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण 'आदरपूर्वक नाकारले' असल्याची घोषणा काँग्रेसने बुधवारी केली. यासोबतच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी 'निवडणुकीच्या फायद्यासाठी' हा 'राजकीय प्रकल्प' बनवल्याचा आरोप पक्षाने केला आहे.
काँग्रेसच्या आरोपाला उत्तर देताना भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, 'जर कोणाला कोणतेही काम करायचे नसेल तर तो निमित्त शोधतो. तसेच हा कार्यक्रम भाजप आणि आरएसएसचा असल्याचे प्रतिष्ठेचे निमित्त काँग्रेसने केले आहे. वास्तविक हा कार्यक्रम राम मंदिर समितीने आयोजित केला आहे.