हैदराबाद - ख्रिसमसचं सेलिब्रेशन झाल्यानंतर आता सर्वत्र नवीन वर्षांच्या स्वागताची तयारी सुरू आहे. जगभरात सरत्या २०२२ या वर्षाला निरोप देत २०२३ च्या आगमनाचा उत्साह दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सराकरनेही रेस्टॉरंट आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच, दारु पिणाऱ्यांनाही परवाने देण्यात वाटप करण्यात येत आहे. एकीकडे नववर्षाच्या जल्लोषाची तयारी सुरू असताना दुसरीकडे आपलं नवीन वर्ष हे गुढी पाडव्याला, हे पाश्चिमात्य संस्कृती आहे, असाही सूर निघत आहे. कट्टर हिंदुत्त्ववादी आणि भाजपचे निलंबित नेते आमदार टी राजा यांनीही नववर्षाच्या स्वागताला विरोध केला आहे.
राजा सिंह यांनी बुधवारी बोलताना म्हटले की, १ जानेवारीला नवीन वर्ष साजरं करणे ही भारतीय संस्कृती नाही. ही वाईट प्रथा असून भारतीय युवकांनी आपली संस्कृती समजून घेतली पाहिजे, तसेच जे भारतीय नाही, त्याचे स्वागत आणि उत्सव साजरे करायला नकोत, असे टी राजा यांनी म्हटले. राजासिंह याचा या विधानाचा व्हिडिओ आता समोर आला आहे. १ जानेवारीला नवीन वर्षाचा उत्सव करणे ही भारतीय संस्कृती नसून विदेशी उत्सव आहे. ज्यांनी २०० वर्षे भारतावर राज्य केलं, त्या लोकांचा हा उत्सव आहे. हा चुकीचा पायंडा पडत असून युवकांनी जागरुक व्हायला हवं. भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या तारखेला आणि मुहूर्ताला नवीन वर्ष साजरं करण्यात येतं, असेही राजासिंह यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपने २३ ऑगस्ट रोजी टी राजा यांना पक्षातून निलंबित केलं आहे. मोहम्मद पैंगबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर, भाजपने राजा सिंह यांना पक्षातून निलंबित केले आहे.