दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या मुद्द्यावर भारत राष्ट्र समितीच्या (BRS) नेत्या के. कविता यांना न्यायालयाने 9 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कविता यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला.
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के. कविता म्हणाल्या की, "ही मनी लाँड्रिंग केस नाही तर पॉलिटिकल लाँड्रिंग केस आहे. एक आरोपी भाजपामध्ये दाखल झाला आहे. दुसऱ्या आरोपीला भाजपाचे तिकीट दिले जात आहे. याशिवाय तिसऱ्या आरोपीने इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून 15 कोटी रुपये दिले. जय तेलंगणा." कविता यांना 15 मार्च रोजी अटक केली होती.
ईडीने गंभीर आरोप केला आहे की, तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता या महत्त्वाच्या सदस्य आहेत, ज्यांनी दिल्लीतील दारू लायसन्सच्या बदल्यात आम आदमी पार्टीला 100 कोटी रुपयांची लाच दिली आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाने (AAP) सर्व आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे.
'आप'चा भाजपावर हल्लाबोल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे नेते संजय सिंह हे दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. यावरूनच आपने भाजपा हे सर्व राजकीय सूडबुद्धीने करत असल्याचा आरोप केला आहे.