मुंबई - केंद्र सरकारकडून संसदेचे ५ दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे, १८ ते २२ सप्टेंबर या काळात केंद्र सरकारने संसदेचे हे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात ५ सत्र होणार आहेत. त्यावरुन आता विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. मोदी सरकारचं हे काम हिंदुविरोधी काम असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. आता, काँग्रेसनेही विशेष अधिवेशनावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.
मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होत असून या बैठकीवेळी माध्यमांशी बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. तसेच, सरकारच्या ५ दिवसीय विशेष अधिवेशानवरही त्यांनी कडक शब्दात टीका केली.
केंद्रातील मोदी सरकारने विरोधी पक्षाला विचारात घेतलं नाही, बिझनेस अॅडव्हाजरी समितीलाही विचारलं नाही. कुणालाही न विचारता संसदेच्या विशेष अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली. मणीपूर जळत असताना, कोरोना काळात, चीन आपल्या जमिनीवर घुसकोरी करत असातनाही विशेष अधिवेशन बोलावलं नाही. नोटबंदीवेळी नाही, कोरोनात लोकांचे होत असलेल्या स्थलांतरावेळीही त्यांनी विशेष अधिवेशन बोलावलं नाही. मात्र, आता अचानक हे विशेष अधिवेशन बोलावलं आहे, असे म्हणत मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली. तसेच, सरकारचा नेमका अजेंडा काय आहे हे मला माहिती नाही. देश चालवण्याचा हा मार्ग नाही, आपण हळू हळू हुकूमशाहीकडे वाटचाल करतोय, असे म्हणत खर्गे यांनी मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला.
दरम्यान, केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक आणू शकते अशी माहिती राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून वन नेशन वन इलेक्शन यावर चर्चा सुरू आहे. सरकार हे विधेयक मंजूर करण्याच्या मानसिकतेत आहे, तर राजकीय पक्ष त्याचा विरोध करत आहेत. त्यामुळे, आता मोदी सरकारच्या विशेष अधिवेशनावरुन चर्चा होत आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत विरोधकांच्या २८ पक्षांचे नेते आले आहेत. त्यातच, हे वृत्त झळकल्याने अनेक खासदारांनी व पक्षांनी आक्रमक भूमिका घेत याला विरोध केलाय.
शिवसेनेनंही साधला निशाणा
केंद्र सरकार आणि संसदीय कामकाज मंत्र्यांनी याबाबत माहिती द्यायला हवी. विशेष अधिवेशनासाठी हीच तारीख का ठरवण्यात आली आहे?, असा सवालही प्रियंका चतुर्वेदींनी विचारला आहे. आता, हिवाळी अधिवेशन होत असताना मध्येच हे विशेष अधिवेशन का बोलावण्यात आले आहे. बिहारमध्ये दिवाळीच्या सुट्ट्या कमी करण्यात आल्या होत्या. त्यावेळी, भाजपने मोठा गदारोळ घातला होता. आता, याच भाजप सरकारने हे हिंदुविरोध काम का केलंय, असा सवालही प्रियंका चतुर्वेदी यांनी विचारला आहे.