"... ही भाजपच्या अंताची सुरूवात," कर्नाटकच्या निकालांवरून ममता बॅनर्जींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 07:27 PM2023-05-13T19:27:44+5:302023-05-13T19:28:27+5:30
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचं अभिनंदन केलंय.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे. तसंच पुढच्या लोकसभा निवडणुकीत भाजप १०० जागाही पार करू शकणार नाही, असा दावा त्यांनी केलाय. “मी कर्नाटकातील सर्व जनतेला सॅल्युट करते. विजेत्यांचे त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन. कुमारस्वामी यांनीही चांगली कामगिरी केली. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या निवडणुका येत आहेत आणि मला वाटतं की दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव होईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी ही भाजपचा अंताची सुरूवात आहे. मला वाटत नाही की ते १०० चा आकडाही पार करू शकतील,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
“कर्नाटक विधानसभा निवडणुकीत निर्दयी हुकूमशाही आणि बहुमतवादी राजकारणाचा पराभव झाला आहे. परिवर्तनाच्या बाजूने निर्णायक जनादेश दिल्याबद्दल मी कर्नाटकच्या जनतेला सॅल्युट करते,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. “जेव्हा लोकांना लोकशाही शक्तींना जिंकवायचं असतं तेव्हा त्यांच्यावर कोणीही दाबू शकत नाही. ही सर्वांसाठी एक शिकवण आहे,” असंही त्या म्हणाल्या.
कर्नाटकात भाजपचा पराभव
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. २२४ जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत भाजपाच्या खात्यात केवळ ६४ जागा गेल्या. तर काँग्रेसने तब्बल १३६ जागांवर विजय मिळवला. या पराभवाबरोबरच भाजपाच्या दक्षिण भारतातील अभियनाला मोठा धक्का बसला आहे.