श्रीगणेशाला पूजेमध्ये प्रथम पूजेचा मान आहे. देशभरात गणेशभक्तांची संख्या मोठी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर गणपतीला आराध्य दैवत मानलं जातं. तुम्हीही विविध गणेश मंदिरांपासून देव्हाऱ्यांपर्यंत अनेक गणेशमूर्ती पाहिल्या असतील. त्यातील अनेक मूर्ती दुर्मीळ आणि मौल्यवान असतील. खरंतर देवाच्या मूर्तीची किंमत ठरवता येत नाही. मात्र जेव्हा तुम्ही मूर्तींच्या दुकानातून किंवा गणपतीच्या चित्रशाळेतून मूर्ती घरी आणता तेव्हा तिच्यासाठी काही शे रुपयांपासून ते हजारांच्या पटीमध्ये रक्कम मोजता. काही सधन लोक लाखो रुपयांची मूर्ती खरेदी करतात. मात्र जर तुम्हाला एका गणेशमूर्तीची किंमत ५०० कोटी रुपयांहून अधिक आहे, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा मूर्तीबाबत सांगणार आहोत. जी जगातील सर्वात महागडी गणेशमूर्ती आहे.
श्री गणेशाची ही मूर्ती ५०० कोटी रुपये असली तरी ती फार मोठी नाही तर ती केवळ २.४४ सेंटीमीटर एवढीच आहे. ही मूर्ती एका अनकट हिऱ्यापासून तयार करण्यात आली आहे. त्यामुळेच या मूर्तीची किंमत ही ५०० कोटी रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. बाहेरून पाहायला ही मूर्ती एका सर्वसाधारण क्रिस्टलच्या मूर्तीसारखी दिसते. मात्र प्रत्यक्षात हा एक हीरा आहे. जो श्री गणेशासारखी दिसते.
श्री गणेसाची आतापर्यंतची सर्वात महागडी मूर्ती ही गुजरातमधील सूरतमधील एका व्यापारी राजेशभाई पांडव यांच्याकडे आहे. राजेशभाई पांडव सूरतच्या कातरगाममध्ये राहतात. त्यांची एका पॉलिशिंग युनिट आहे. त्याबरोबरच राजेशभाई पांडव हे इतर काही व्यवसायही करतात. राजेशभाई आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार ही मूर्ती जेव्हा घरात स्थापन केली तेव्हापासून त्यांची प्रगती होत आहे.
राजेशभाई पांडव यांना ही मूर्ती दक्षिण आफ्रिकेमध्ये भेटली होती. मात्र २००५ मध्ये जेव्हा तिचा लिलाव केला जात होता. तेव्हा एक हीरा म्हणून विकण्यात आले होते. मात्र राजेशभाई पांडव यांनी जेव्हा हा हीरा पाहिला, तेव्हा त्यांना त्यामध्ये श्री गणेशाची मूर्ती दिसली. त्यामुळे त्यांनी हा अनकट हीरा खरेदी केला. जेव्हा राजेशभाई पांडव यांनी हा हीरा खरेदी केला. तेव्हा त्याची किंमत २९ हजार रुपये होती. ही मूर्ती २०१६ मध्ये सूरतमध्ये झालेल्या हीरा उद्योगातील वार्षिक प्रदर्शनात सादर करण्यात आली होती.