त्यामुळेच कुनो पालपूरची चित्ता अभयारण्यासाठी निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 06:47 AM2022-09-18T06:47:00+5:302022-09-18T06:47:28+5:30

सिंह व पट्टेदार वाघाच्या उलट चित्त्यांना घनदाट जंगल मानवत नाही. ते गवताळ मैदानात राहणे अधिक पसंत करतात.

This led to the selection of Kuno Palpur as a cheetah sanctuary | त्यामुळेच कुनो पालपूरची चित्ता अभयारण्यासाठी निवड

त्यामुळेच कुनो पालपूरची चित्ता अभयारण्यासाठी निवड

googlenewsNext

शरद गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : नामिबीयातून आणण्यात येणाऱ्या चित्त्यांसाठी अधिवास म्हणून मध्य प्रदेशातील बांधवगड, पेंच आणि पन्ना यांसारख्या जगप्रसिद्ध वन्यजीव अभयारण्यांऐवजी कुनो-पालपूरच्या जंगलाची निवड करण्यात आली. विस्तीर्ण गवताळ प्रदेश व भक्ष्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे चित्त्यांसाठी हे जंगलच अधिक पोषक राहणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

सिंह व पट्टेदार वाघाच्या उलट चित्त्यांना घनदाट जंगल मानवत नाही. ते गवताळ मैदानात राहणे अधिक पसंत करतात. कुनो पालपूरच्या ७४८ चौरस किलोमीटरच्या जंगलामध्ये विशाल गवताळ मैदान असून, भक्ष्याचीही ददात नाही. सोबतच तेथे मनुष्याचाही हस्तक्षेप नाही, असे वन्यजीव तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे डॉ. एन. के. रंजीत सिंह व वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. वाय. व्ही. झाला यांनी २००९ पासून चित्त्यांना भारतात आणण्याची शक्यता तपासणे सुरू केले होते. त्यांच्या अभ्यासाच्या आधारेच जानेवारी २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या योजनेला मंजुरी दिली होती.

२०१० ते २०१२ दरम्यान मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात व उत्तर प्रदेशातील जवळपास दहा जंगलांचे सर्वेक्षण केल्यानंतर चित्त्यांच्या अधिवासासाठी कुनो पालपूर जंगल सर्वात अनुकूल असल्याचे आढळून आले होते. या जंगलातील २४ गावे रिकामी करून तेथील रहिवाशांना जंगलाबाहेर विस्थापित करण्यात आले आहे. त्यामुळे चित्त्यांचा मानवाशी संघर्ष होण्याची शक्यता कमी आहे.

सिंह आणि वाघ घनदाट जंगलात सावज पकडणे पसंत करतात. कारण, ते पूर्ण क्षमतेने केवळ ४० ते ५० मीटरच धावू शकतात. याउलट चित्ते जवळपास अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत विजेच्या वेगाने धावतात. त्याचबरोबर ते झुंडीने शिकार करतात. कुनो पालपूरमध्ये चितळ, सांबर, रानडुक्कर, नीलगाय व बाराशिंगा यांसारख्या सावजाची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. त्यामुळे चित्त्यांचे अस्तित्व टिकून राहण्यासह त्यांच्या वंशवृद्धीची शक्यता अधिक आहे, असे प्रसिद्ध वन्यजीवतज्ज्ञ अजय सुरी म्हणाले.

Web Title: This led to the selection of Kuno Palpur as a cheetah sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.